नवी दिल्ली,
mann ki baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १३७व्या भागातून देशातील तरुण, महिला सक्षमीकरण, इतिहासाचे ज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील विद्यार्थिनींच्या सहभागावर भाष्य केले. ‘मन की बात’ हे नवीन उपक्रम आणि कल्पना देशासमोर आणण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “देशात तरुण निर्मात्यांची कमतरता नाही,” असे म्हणत मोदी यांनी तरुणांच्या नव्या कल्पनांचे कौतुक केले.
इतिहास अधिक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी तरुणांना bharatrajya.com या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले. या वेबसाइटवर कोणतेही वर्ष निवडल्यानंतर त्या काळात भारताच्या कोणत्या भागावर कोणाचे राज्य होते, याची माहिती मिळू शकते. मुंबईचे कृष्णा शेषाद्री यांनी ही वेबसाइट तयार केली आहे. त्यांचा हा उपक्रम इतिहासाच्या विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्यांनाही इतिहास समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. ‘विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा’ ही मोहीम वेगाने पुढे जात असून मोठ्या संख्येने तरुण त्यात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांचे व्यसन केवळ संबंधित व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम कुटुंब आणि संपूर्ण समाजावरही होतो. त्यामुळे तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवून भारताला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी ‘पीएम स्वनिधी योजने’चाही उल्लेख करत महिला सक्षमीकरणातील तिच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी अंदाजे ४६ टक्के महिला आहेत. म्हणजेच देशभरातील अंदाजे ३५ लाख महिला या योजनेचा लाभ घेत व्यवसाय वाढवत असल्याचे मोदी यांनी सांगितले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेतून मिळणारा आधार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अंतराळ क्षेत्रातील विद्यार्थिनींच्या सहभागाबाबत बोलताना मोदी यांनी ‘मिशन शक्तीसॅट’चा उल्लेख केला. या मोहिमेच्या माध्यमातून १०८ देशांतील १२,००० विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची तसेच नवोन्मेषाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळत आहे. २३ ऑगस्ट रोजी साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे या मोहिमेचे सुंदर छायाचित्र पाहायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.