‘तुमचे अकाउंट दहशतवाद्यांशी जोडले आहे

अधिकाऱ्याला १२ दिवस हाउस अरेस्ट केले

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
नाशिक
nashik cyber scam नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याला दहशतवादाच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत तब्बल ९० लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचं भासवत संबंधित अधिकाऱ्याला तब्बल १२ दिवस घरातच हाउस अरेस्ट करून ठेवलं. या काळात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत बँक खात्यातील रकमेची रिझर्व्ह बँकेमार्फत चौकशी करायची असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अधिकाऱ्याकडून तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग करून घेण्यात आले.
 

nashik cyber scam private company official loses ₹90 lakh after 12-day digital house arrest 
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित अधिकाऱ्याला एका फोन कॉलद्वारे संपर्क करण्यात आला. समोरील व्यक्तींनी आपण एटीएसचे अधिकारी असल्याचं सांगितलं. जम्मू-काश्मीरमध्ये पीडिताच्या आधार कार्डचा वापर करून काही बँक खाती उघडण्यात आली असून, या खात्यांमधून दहशतवाद्यांनी मनी लॉण्डरिंग केल्याचा संशय असल्याचं त्याला सांगण्यात आलं.
या कथित प्रकरणातील बँक खात्यांचा संबंध पीडित अधिकाऱ्याच्या बँक खात्याशी जोडला जाऊ शकतो, अशी भीतीही त्याला दाखवण्यात आली. त्यामुळे तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची गरज असल्याचं सांगत गुन्हेगारांनी अधिकाऱ्याला घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले. अशा प्रकारे त्याला घरातच अटक असल्याचं भासवण्यात आलं.
यानंतर तब्बल १२ दिवस गुन्हेगारांनी चार वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अधिकाऱ्याशी संपर्क कायम ठेवला. बँक खात्यातील शिल्लक रकमेची रिझर्व्ह बँकेमार्फत चौकशी करायची असल्याचं सांगून त्याला पैसे दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडण्यात आलं.
यासाठी तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्याचे निर्देश देण्यात आले. दहशतवाद आणि तपास याबाबत निर्माण करण्यात आलेल्या भीतीच्या वातावरणामुळे अधिकाऱ्याने गुन्हेगारांच्या सूचनेनुसार पैसे पाठवले. अशा प्रकारे त्याच्याकडून एकूण ९० लाख रुपये उकळण्यात आले.
विशेष म्हणजे, या संपूर्ण फसवणुकीत आरोपींनी पीडित अधिकाऱ्याची प्रत्यक्ष भेट घेतली नाही. केवळ फोन कॉल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी हा प्रकार केला. एटीएस, मुंबई पोलिस आणि दहशतवादासारख्या गंभीर विषयांचा उल्लेख करून अधिकाऱ्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वीच गुन्हेगारांच्या सांगण्यावरून मोठी रक्कम वर्ग केली.
या प्रकरणाची नाशिक पोलिसांनी nashik cyber scam  दखल घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा प्रकारचे फोन कॉल किंवा व्हॉट्सअॅप संदेश आल्यास घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणतीही सरकारी संस्था नागरिकांना त्यांच्या बँक खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगत नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.