नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट ७०० जणांचा मृत्यू

हजारो बेपत्ता, तिबेटमधून पुन्हा जल-मलब्याचा धोका

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
काठमांडू
nepal flood नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या भीषण आपत्तीत आतापर्यंत सुमारे ७०० जणांचा मृत्यू झाला असून, विविध भागांत अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. हजारो नागरिक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान नेपाळमध्ये पुन्हा एकदा भीषण पुराचा इशारा देण्यात आला आहे. तिबेटच्या पर्वतीय भागात पुन्हा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा खालच्या भागांकडे वाहून येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
 
vg
यापूर्वी तिबेटच्या पर्वतात बर्फाचा मोठा तुकडा तुटल्याने नेपाळमध्ये जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात मलबा आणि महाकाय दगड वाहून आल्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. आता तिबेटमध्ये पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा पुन्हा निचरा भागांकडे येऊ शकतो. या प्रवाहाच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा बांधकामाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने नागरिकांना सतर्क केले आहे. रासुवा जिल्हा प्रशासन कार्यालयाला भोटे कोशी नदीच्या प्रवाहाचा वेग वाढल्याचा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नदीच्या आसपासच्या रासुवा, नुवाकोट आणि धाडिंगपर्यंतच्या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट देण्यात येईल, असेही प्राधिकरणाने ‘एक्स’वर स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या भीषण पुरानंतर २७५ हून अधिक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. यातील १०८ जणांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे १२८ जणही बेपत्ता आहेत. गेल्या दोन दिवसांत ५९८ भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. तर सुमारे ९०० भारतीय नागरिक अद्याप चीनमध्ये असून ते सुरक्षित आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधता येत आहे.
रासुवा येथील एका जलविद्युत प्रकल्पातून चार भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. रिपु कुमार, चनेश्वर नरजरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन अशी या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण लवकरच काठमांडूला पोहोचण्याची शक्यता आहे. रासुवा हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे.
 
 ११ टन मदतसामग्रीची चौथी खेप
दरम्यान, भारताने नेपाळच्या मदतकार्यासाठी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या C-130J लष्करी वाहतूक विमानातून ११ टन मदतसामग्रीची चौथी खेप पाठवली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, या विमानातून शोध आणि बचाव मोहिमेसाठी आवश्यक उपकरणांसह तांत्रिक पथकही पाठवण्यात आले आहे. याशिवाय डीएनए विश्लेषणासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक आणि आवश्यक फॉरेन्सिक उपकरणेही पाठवण्यात आली आहेत. पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी हे फॉरेन्सिक पथक नेपाळी अधिकाऱ्यांना मदत करणार आहे.
याशिवाय २३० फूट लांबीच्या ‘सिंगल लेन मॉड्युलर स्टील ब्रिज’साठी आवश्यक उपकरणे घेऊन जाणारे १६ ट्रकही नेपाळमध्ये पोहोचले आहेत. आणखी सात बेली ब्रिज उभारण्यासाठी लागणारी उपकरणे लवकरच पाठवण्यात येणार आहेत. हे पूल उभारण्यासाठी तांत्रिक पथकेही लवकरच नेपाळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
भारताने आतापर्यंत नेपाळला एकूण ६८.५ टन मदतसामग्री पाठवली आहे. एका बाजूला बचाव आणि मदतकार्य सुरू असतानाच तिबेटमधून पुन्हा पाणी व मलब्याचा धोका निर्माण झाल्याने नेपाळसमोर संकट आणखी गडद झाले आहे.