मुंबई
nikki tamboli ‘बिग बॉस मराठी 5’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
‘बिग बॉस मराठी 5’च्या घरात असताना निक्की आणि अरबाज यांच्यातील जवळीक प्रकर्षाने जाणवली होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शो संपल्यानंतरही त्यांच्यातील नातं कायम राहिल्याचं बोललं जात होतं. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती.मात्र, आता निक्की आणि अरबाज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं आहे, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, दोघांनीही अद्याप त्यांच्या ब्रेकअपबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा यासंदर्भात सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, दोघांनी सोशल मीडियावर केलेल्या काही क्रिप्टिक पोस्टमुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. निक्कीने अफेअर आणि नात्यातील दुर्लक्षासंदर्भात एक पोस्ट शेअर केली. नात्यातील व्यक्ती प्रयत्न करणं थांबवते आणि दिलेली आश्वासनं विसरते, तेव्हा बाहेरचं नातं निर्माण होऊ शकतं, असा आशय या पोस्टमधून व्यक्त करण्यात आला होता.दुसरीकडे, अरबाजनेही बेवफाईचा उल्लेख करणारी एक स्टोरी शेअर केली. जोडीदाराची फसवणूक केल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीकडे जाऊन तिच्या डोळ्यांत पाहत प्रेम व्यक्त करणं हा अनादराचा कळस असल्याचा आशय त्याच्या पोस्टमध्ये होता.
निक्की आणि अरबाज यांच्या या सोशल मीडिया पोस्ट नेमक्या एकमेकांसाठी आहेत का, याबाबत मात्र दोघांकडून कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. त्यामुळे अरबाजने आपल्या पोस्टमधून नेमका कोणाला इशारा केला आहे, तसेच निक्कीच्या पोस्टमागील संदर्भ काय आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.