एसआयआरमध्ये १ लाख ७८ हजार १५२ मतदार पडताळणीबाहेर

मतदारांना दुरुस्तीची संधी

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
वर्धा,
opportunity for voters to make corrections भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन एसआयआर कार्यक्रमांतर्गत महिनाभर जिल्ह्यात मतदार याद्यांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ७८ हजार १५२ मतदारांची नोद पडताळणी बाहेर असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या नोंदींचा अर्थ संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून तत्काळ वगळण्यात आली आहेत, असा होत नाही. अंतिम निर्णयापूर्वी संबंधित मतदारांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
 
 voters to make corrections
 
मोठ्या संख्येने मतदार पडताळणीबाहेर असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ही संख्या अंतिम मतदार यादीतून वगळण्यात येणार्या मतदारांची संख्या नाही. ही पडताळणी प्रक्रियेदरम्यान निश्चित माहिती उपलब्ध न झालेल्या मतदारांची प्राथमिक नोंद आहे. सुनावणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे पडताळणीबाहेर नोंद झालेल्या मतदारांनी घाबरून न जाता निवडणूक विभागाकडून मिळणार्या नोटीसकडे गांभीर्याने पाहावे आणि निर्धारित मुदतीत फॉर्म क्रमांक ८ व आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याची गरज आहे.
 
 
राजकीय पक्षांनादेखील याबाबतची यादी उपलब्ध करण्यात आली आहे, पडताळणीबाहेर असलेल्या मतदारांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये मतदारांना त्यांना कुठे नाव नोंदणी ठेवायची आहे, हे देखील सांगता येणार आहे. पडताळणी बाहेर असलेल्या मतदारांना यासाठी फॉर्म क्रमांक ८ भरून द्यावा लागणार आहे. मतदाराने आपली नोंद योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक विभागाकडून त्याची पडताळणी केली जाणार आहे. संबंधित निर्णयाविरोधात अपील करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता, आर्वी विधानसभा मतदारसंघात ३७ हजार ३०२, देवळी मतदारसंघात ४५ हजार ६५७, हिंगणघाट मतदारसंघात ४७ हजार ८६६, तर वर्धा विधानसभा मतदारसंघात ४७ हजार ३२७ मतदार पडताळणीबाहेर असल्याचे आढळले आहे.
 
वर्धा जिल्ह्यात १० हजार ४५७ सापडू न शकलेले गैरहजर, ९५ हजार २२३ कायमस्वरूपी स्थलांतरित, २४ हजार ५५० अन्यत्र नोंदणी केलेले, दुबार, ४७ हजार ६६० मृत, २६२ इतर असे १ लाख ७८ हजार १५२ मतदार पडताळणीबाहेर असल्याची बाब अहवालातून पुढे आलेली आहे.