परभणी
sanjay jadhav खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी करत खासदार संजय जाधव यांना फोन केला होता. मेळावा रद्द न केल्यास आपण स्वतः तेथे येऊ, असा इशाराही त्यांनी फोनवरून दिल्याची माहिती आहे. मात्र, जाधव यांनी मेळावा रद्द न केल्याने कार्यक्रमस्थळाबाहेर काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परभणीतील या शेतकरी मेळाव्यासाठी जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना खासदार संजय जाधव भाषण करत होते. त्याचवेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
परिस्थिती अधिक तणावपूर्ण होण्यापूर्वी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी सभास्थळावरून बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य वाद वाढण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आले. या घटनेनंतर काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण होते; मात्र सध्या मेळाव्याच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मेळावा रद्द करण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. मेळावा रद्द करण्याची मागणी करत त्यांनी तसे न केल्यास आपण कार्यक्रमस्थळी येऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतरही मेळावा आयोजित करण्यात आल्याने कार्यक्रमस्थळाबाहेर घोषणाबाजी झाल्याने या घटनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.