पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे नियोजन

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या "टाईमलाईन"ने गती द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
gorewada-international-zoo हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे निश्चित करून त्यांची पूर्तता कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहे. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य कामांची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्यासंदर्भात नियोजन केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
gorewada
गोरेवाडा प्रकल्पाची पाहणीगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी हा गोरेवाडा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. गोरेवाड्यात सुरू असलेल्या सर्व कामांसाठी नव्याने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
रेस्क्यू सेंटर देशातील सर्वोत्तम

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरच्या विकासाबाबत फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रथम रेस्क्यू सेंटर, त्यानंतर इंडियन सफारी सुरू करण्यात आली असून पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. या सफारीत बिग फाईव्ह म्हणून ओळखले जाणारे प्राणी आणण्यात येणार आहेत. हे रेस्क्यू सेंटर देशातील सर्वोत्तम केंद्रांपैकी एक झाले असून पशुवैद्यकीय डॉक्टरांना वन्य प्राण्यांवरील उपचार आणि प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव येथे मिळतो. देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. वन्य पर्यटनासोबतच वन्यजीव संवर्धनाचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गोरेवाडा प्रकल्पातील विविध कामांची माहिती घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील वसंतराव नाईक प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, वाईल्डलाईफ रेस्क्यू व ट्रेनिंग सेंटरचे संचालक शिरीष उपाध्ये, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, विभागीय व्यवस्थापक तथा प्राणिसंग्रहालय संचालक पांडुरंग पाखले यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी गोरेवाडा प्रकल्पाची आतापर्यंतची वाटचाल, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या विविध कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सादरीकरणात देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. या टप्प्यात वाईल्डलाईफ रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी आणि एंट्रन्स प्लाझा यांचा समावेश आहे.

 
विविध टप्प्यात होणार विकास कामेपहिल्या टप्प्यातील ही कामे पूर्ण झाल्यानंतर गोरेवाडा प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. आफ्रिकन सफारीसह महत्त्वाची कामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहेत. वॉकिंग ट्रेल, आफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा, ॲनिमल हॉस्पिटल आणि क्वारंटाईन ब्लॉक यांचा समावेश असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. यातील आफ्रिकन सफारीच्या कामाच्या प्रगतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष माहिती जाणून घेतली.
 

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात ट्रेल ऑफ सेन्सेस, बायोपार्क, नाईट झू, गोंडवाना पार्क, बायो डिस्कव्हरी प्लाझा आणि ट्रायबल ट्रेल यांचा समावेश असल्याची माहिती सादरीकरणात देण्यात आली. या विविध सुविधांच्या माध्यमातून गोरेवाडा प्रकल्पाचा वन्यजीव पर्यटनासोबतच जैवविविधता, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

 
प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. गोरेवाड्याचा विकास करताना दीर्घकालीन पर्यटनाच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ताडोबा आणि पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोरेवाड्यात एक ते दोन दिवस पर्यटनासाठी घालवावेत, या दृष्टीने गोरेवाड्याचा विकास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ताडोबा आणि गोरेवाडा या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणारे प्रभावी नियोजन करून पर्यटकांचा मुक्काम वाढेल, अशा पद्धतीने सुविधा विकसित करण्याची सूचना त्यांनी केली.गोरेवाडा प्रकल्पात वन्यजीव पर्यटनासोबत पर्यटकांना विविध अनुभव देणाऱ्या सुविधा विकसित करून विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून गोरेवाड्याची ओळख निर्माण करण्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
 

प्राणी उद्यानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील विविध सुविधांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नागपूरजवळील प्राणिसंग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरच्या विकासाबाबत फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रथम रेस्क्यू सेंटर, त्यानंतर इंडियन सफारी सुरू करण्यात आली असून पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे नियोजन आहे. या सफारीत बिग फाईव्ह म्हणून ओळखले जाणारे प्राणी आणण्यात येणार आहेत. हे रेस्क्यू सेंटर देशातील सर्वोत्तम केंद्रांपैकी एक झाले असून पशुवैद्यकीय डॉक्टरांना वन्य प्राण्यांवरील उपचार आणि प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव येथे मिळतो. देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. वन्य पर्यटनासोबतच वन्यजीव संवर्धनाचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.