बंगळुरू
duleep-trophy प्रतिष्ठेच्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानावर रविवारपासून प्रारंभ झालेल्या पूर्व विभागाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात रिंकू सिंगचे (६०) अर्धशतक आणि आर्यन जुयाल (४६) व यश ठाकूरच्या (नाबाद ३०) दमदार फलंदाजीच्या बळावर मध्य विभागाने पहिल्या डावात ८०.१ षटकांत सर्वबाद २६६ धावांची नोंद केली. यश राठोड व हर्ष दुबेने प्रत्येकी २७ धावांचे योगदान दिले.पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मध्य विभागाच्या अमन मोखाडे व आर्यन जुयालने डावाची सुरुवात केली, परंतु धावफलकावर जेमतेम २८ धावा असातना अभिजीत सरकारने सलामीवीर मोखाडेला (८) ईश्वरनकडून झेलबाद केले. त्यानंतर सरकारने कुणाल चंडेलाला (६) पायचित केले. मात्र आर्यन जुयालने कर्णधार रजत पाटीदार (१२) व यश राठोडच्या (२७) मदतीने संघाला सव्वाशे धावांचा टप्पा गाठून दिला. वैयक्तिक अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना आर्यन जुयालला मुकेश कुमारने बाद केले. आर्यनने ११३ चे्ंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांची खेळी केली.
रिंकू सिंगने बहारदार फलंदाजी करून मध्य विभाग संघात चैतन्य निर्माण केले. त्याला हर्ष दुबे (२७) व सारांश जैनची (१३) उत्तम साथ मिळाली. रिंकू सिंगने ८८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. आर्यन पांडे (२२) व यश ठाकूरनेही (३०) धैर्याने पूर्व विभागाच्या गोलंदाजांचा सामना करत संघाला ८०.१ षटकांत सर्वबाद २६६ धावांचा टप्पा गाठून दिला. पूर्व विभागाकडून मुकेश कुमार व अभिजित सरकारने प्रत्येकी ३ बळी, तर मोहम्मद शमी व मोहम्मद कुरेशीने प्रत्येकी २ बळी टिपले.
दुखापतीमुळे किशन बाहेर; सूर्यवंशी पूर्व विभागाचा हंगामी कर्णधारपूर्व विभागाचा नियमित कर्णधार ईशान किशन याला दुखापत झाल्यामुळे, किशोरवयीन खेळाडू वैभव सूर्यवंशी याला वरिष्ठ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली. रविवारी मध्य विभागाविरुद्धच्या दुलिप करंडक उपांत्य सामन्यात त्याने पूर्व विभागाच्या हंगामी कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली.
मध्य विभागाच्या फलंदाजीदरम्यान यष्टिरक्षण करत असताना किशनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर यष्टिरक्षणाची जबाबदारी कुमार कुशाग्राने स्वीकारली, तर सूर्यवंशीने तात्पुरत्या स्वरूपात संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली.