समय रैना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

काश्मीरी पंडितांवरील कथित विनोदावर राम कदम संतापले, म्हणाले, “देशाची माफी मागा”

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
मुंबई
samay raina   स्टँडअप कॉमेडियन समय रैना आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. आता ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ या शोच्या ताज्या भागातील कथित विनोदामुळे समय रैना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. काश्मीरी पंडित आणि बिहारी समाजाच्या संदर्भात करण्यात आलेल्या कथित विनोदावरून हा वाद निर्माण झाला असून, भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी समय रैनाच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे वक्तव्य काश्मीरी पंडित समाजाचा अपमान करणारे असल्याचं म्हणत कदम यांनी त्याचा निषेध केला. काश्मीरी पंडितांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणं कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 

samay raina lands in fresh controversy over alleged kashmiri pandit joke; ram kadam demands apology 
राम कदम म्हणाले, “काश्मीरी पंडित हे या देशाचा अविभाज्य भाग आहेत. दहशतवादी आणि पाकिस्तान-ISIच्या कारवायांमुळे त्यांना आपली घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं. ज्या समाजाने इतकं दुःख आणि अत्याचार सहन केले आहेत, त्यांच्याविरोधात अशी आक्षेपार्ह भाषा वापरणं हे या सभ्य समाजात स्वीकारलं जाऊ शकत नाही. हे अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. ज्याने अशी टिप्पणी केली, त्या व्यक्तीने देशाची माफी मागितली पाहिजे.”
कलाकारांच्या प्रतिभेचा आदर असला तरी विनोदाच्या नावाखाली काही मर्यादा ओलांडल्या जाऊ नयेत, असंही राम कदम यांनी म्हटलं. “आम्ही कलाकारांच्या प्रतिभेचा आदर करतो. पण काही मर्यादा आणि सीमा असणं गरजेचं आहे. एखाद्याच्या मनातील श्रद्धा, भावना किंवा आस्था यांना कोणी दुखावत असेल, तर अशा वक्तव्याला कला म्हणता येणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.समय रैना असो किंवा अन्य कोणताही कलाकार, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखाद्या समाजाला किंवा व्यक्तीला जाणीवपूर्वक लक्ष्य करणं योग्य नसल्याचंही कदम यांनी म्हटलं. “काश्मीरी पंडित किंवा बिहारी समाजाची खिल्ली का उडवली जाते? हा प्रसिद्धी मिळवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचं दिसतं,” अशा शब्दांत त्यांनी समय रैनावर टीका केली.
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’चा पाचवा samay raina एपिसोड 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या भागात कॉमेडियन शैरन वर्मा पॅनेलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या बिहारच्या आहेत. शोदरम्यान रोस्टिंगच्या भागात समय रैनाने शैरन यांच्या बिहारशी असलेल्या संबंधांचा संदर्भ देत विनोद केला.“शैरन एक बिहारी आहेत, ज्या कामाच्या शोधात मुंबईत आल्या आहेत. जस्ट बिहारी थिंग्स,” असं समय रैनाने म्हटलं. त्यावर शैरन यांनी समय रैना काश्मीरी पंडित असल्याचा संदर्भ देत त्याला प्रत्युत्तर दिलं. “कमीत कमी मी माझं राज्य माझ्या इच्छेने तरी सोडलं,” असं शैरन म्हणाल्या.या दोघांमधील संवादातील काही क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर या वक्तव्यांवरून नवा वाद निर्माण झाला असून, समय रैनावर टीकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनीही या प्रकरणाची दखल घेत काश्मीरी पंडित समाजाच्या भावनांचा विचार करून अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.