बदलते हवामान संकट अन् अन्नसुरक्षेची लढाई

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
गाथा पर्यावरणाची
मिलिंद बेंडाळे
पर्यावरण अभ्यासक
changing climate crisis विकासाच्या नावाखाली निसर्गाचा अतिरेकी ऱ्हास सुरू राहिल्यास त्याची सर्वाधिक किंमत शेती आणि सामान्य माणसाला माेजावी लागेल. हवामान बदल हा केवळ पर्यावरणवाद्यांचा विषय नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या ताटातील अन्नाशी जाेडलेला प्रश्न आहे. त्यामुळे सरकार, उद्याेग, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि सामान्य नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
---
 
changing climate crisis
 
 
 
पृथ्वीवरील हवामानाचा समताेल बिघडत चालला आहे. त्याचे परिणाम आता केवळ वैज्ञानिक अहवालांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जगातील प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक नागरिक त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवत आहे. उष्णतेच्या विक्रमी लाटा, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दीर्घकालीन दुष्काळ, हिमनद्या वितळणे, समुद्राच्या पाण्याची वाढणारी पातळी आणि नैसर्गिक आपत्तींची वाढती तीव्रता ही आता अपवादात्मक घटना राहिलेली नाही. या सर्व घटनांमुळे सर्वाधिक धाेक्यात आली आहे, ती म्हणजे शेती आणि त्यातून निर्माण हाेणारी अन्नसुरक्षा. जगाची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असताना अन्नधान्य उत्पादनावरच संकट ओढवू लागले, तर त्याचे परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवर नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय स्थैर्यावरही हाेणार आहेत. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामागे मानवी हस्तक्षेप हा प्रमुख घटक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. औद्याेगिकीकरण, जीवाश्म इंधनाचा वाढता वापर, जंगलताेड, शहरीकरण, अनियंत्रित औद्याेगिक विस्तार आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. परिणामी, पृथ्वीचे तापमान वाढत असून निसर्गाचे संपूर्ण चक्र विस्कळीत हाेत आहे. विकासाच्या स्पर्धेत मानवाने निसर्गाशी केलेल्या सततच्या छेडछाडीची किंमत आता संपूर्ण जगाला माेजावी लागत आहे. भारतात या संकटाची तीव्रता अधिक गंभीर आहे. कारण देशातील माेठी लाेकसंख्या आजही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे.
भारतीय शेतीचे माेठे वैशिष्ट्य म्हणजे मान्सूनवर असलेले अवलंबित्व. पावसाचा याेग्य वेळी आणि याेग्य प्रमाणात हाेणारा वर्षाव हा शेतीच्या यशाचा मूलभूत आधार आहे; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनचा स्वभावच बदलला आहे. कधी पाऊस उशिरा सुरू हाेताे, कधी मध्येच खंड पडताे तर कधी काही तासांमध्ये महिनाभराचा पाऊस काेसळताे. परिणामी, पेरणी, वाढ, फुलाेरा आणि कापणी या शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे फळबागांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. उन्हाळ्यातील विक्रमी तापमानामुळे ऊस, भाजीपाला, कडधान्ये आणि फळपिकांवर परिणाम हाेत आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे भात, साेयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. शेतकऱ्याला आता निसर्गाचा अंदाज घेणे अवघड झाले आहे. पूर्वीच्या अनुभवावर आधारित शेतीचे गणित हवामान बदलामुळे पूर्णपणे बदलले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने इशारा दिला आहे की, वाढते तापमान, दुष्काळ, पूर आणि जमिनीची घटणारी सुपीकता यामुळे जगातील अनेक भागांमधील शेती गंभीर संकटात सापडू शकते.changing climate crisis मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये अन्नधान्य उत्पादनावर माेठा परिणाम हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे; परंतु ही समस्या केवळ त्या प्रदेशापुरती मर्यादित नाही. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील विकसनशील देशांनाही या संकटाचा माेठा फटका बसणार आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही चेतावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
आंतरसरकारी हवामान बदल पॅनेलच्या अहवालानुसार २०४० पर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढल्यास पिकांच्या उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम हाेऊ शकताे. पुढे २०५० पर्यंत ८ काेटींहून अधिक लाेकांना उपासमारीचा धाेका निर्माण हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा अर्थ हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न राहिला नसून अन्नसाखळी, पाेषण आणि मानवी आराेग्याशी संबंधित जागतिक संकट बनला आहे. शेतीची उत्पादकता अनेक नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, याेग्य तापमान, आर्द्रता आणि कीडराेगांचे नियंत्रण या सर्व घटकांचा समताेल आवश्यक असताे. हवामान बदलामुळे या प्रत्येक घटकावर परिणाम हाेत आहे. तापमान वाढल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी हाेत आहे. पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे. परिणामी, सिंचनाची गरज वाढते आणि भूजलावरचा ताण अधिक वाढताे. अनेक भागांमध्ये भूजलाची पातळी धाेकादायकरीत्या खाली गेली आहे. नद्यांमधील पाण्याचा प्रवाह कमी हाेत असून हिमालयातील हिमनद्यांचे वेगाने वितळणे भविष्यातील जलसंकटाची स्पष्ट चाहूल देत आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या शतकाच्या अखेरीस पृथ्वीचे तापमान ३.७ ते ४.८ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. ही वाढ शेतीसाठी अत्यंत घातक ठरू शकते. गहू, बार्ली, माेहरी, बटाटा यांसारखी थंड हवामानातील पिके माेठ्या प्रमाणावर प्रभावित हाेतील. उष्णतेमुळे मका, भात आणि ज्वारीसारख्या पिकांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया कमी हाेईल. परिणामी उत्पादनात माेठी घट हाेण्याची शक्यता आहे. त्याचबराेबर वाढत्या तापमानामुळे अनेक नवीन किडी आणि राेगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतीचा खर्च वाढेल आणि उत्पादन घटेल.
भारतातील हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम लहान आणि सीमांत शेतकऱ्यांवर हाेत आहे. त्यांच्या शेतीचे क्षेत्र कमी असल्यामुळे एक-दाेन हंगामांचे नुकसानही त्यांना आर्थिक संकटात ढकलते. वाढता उत्पादन खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि नैसर्गिक आपत्ती या तिहेरी संकटामुळे शेतीचे अर्थकारण दिवसेंदिवस कमकुवत हाेत आहे. त्यामुळे अनेक तरुण शेती साेडून शहरांकडे स्थलांतर करत आहेत. ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिली, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हाेऊ शकतात. हवामान बदलामुळे मातीच्या गुणवत्तेवरही गंभीर परिणाम हाेत आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी हाेत आहे. नैसर्गिक नायट्राेजनची उपलब्धता घटत असल्यामुळे रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणखी कमी हाेत आहे. हे एक दुष्टचक्र तयार झाले आहे. अधिक उत्पादनासाठी अधिक रासायनिक घटक वापरले जातात. त्यामुळे मातीची गुणवत्ता अधिक खालावते. आज जगातील बहुतांश देश हवामान बदलाचा सामना करत असले, तरी त्याची तीव्रता विकसनशील देशांमध्ये अधिक आहे. कारण या देशांमध्ये शेतीवर अवलंबून असलेल्या लाेकांची संख्या माेठी आहे. हवामान बदलामुळे केवळ अन्नधान्याचे उत्पादन कमी हाेत नाही, तर ग्रामीण राेजगार, पिण्याचे पाणी, पशुधन, आराेग्य आणि स्थानिक अर्थव्यवस्था यावरही व्यापक परिणाम हाेताे.
२०५० पर्यंत जगाची लाेकसंख्या साडेनऊ अब्जांहून अधिक हाेण्याचा अंदाज आहे. या वाढत्या लाेकसंख्येच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी सुमारे ७० टक्के अधिक अन्नधान्य उत्पादन करावे लागेल; मात्र हवामान बदलामुळे शेतीची उत्पादकता घटत असेल, तर ही गरज पूर्ण करणे अत्यंत कठीण हाेईल. परिणामी अन्नधान्याच्या किमती वाढतील, महागाई वाढेल आणि गरीब देशांमध्ये उपासमार आणि कुपाेषणाचे प्रमाणही वाढू शकते. या संकटाचा सामना करण्यासाठी केवळ शेतकऱ्यांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. सरकार, संशाेधन संस्था, उद्याेग, आंतरराष्ट्रीय संघटना आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती विकसित करणे, कमी पाण्यात येणाऱ्या वाणांचा प्रसार, सूक्ष्म सिंचनाचा विस्तार, जलसंधारण, मृदासंवर्धन, सेंद्रिय शेती, हवामानाचा अचूक अंदाज आणि प्रभावी पीक विमा व्यवस्था यांना प्राधान्य द्यावे लागेल. त्याचबराेबर शेतकऱ्यांना याेग्य बाजारभाव, प्रक्रिया उद्याेग आणि साठवण सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील. जागतिक स्तरावरही कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिक कठाेर धाेरणांची आवश्यकता आहे. विकसित देशांनी ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारून विकसनशील देशांना हरित तंत्रज्ञान, हवामान वित्त आणि संशाेधनासाठी अधिक मदत करणे आवश्यक आहे. हवामान बदलावर केवळ परिषदांमध्ये चर्चा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. भारतानेही विकास आणि पर्यावरण यांच्यात समताेल साधणारे धाेरण स्वीकारणे आवश्यक आहे. नवीकरणीय ऊर्जा, हरित उद्याेग, वृक्षाराेपण, जलसंधारण आणि शाश्वत शेती यांना प्राधान्य द्यावे लागेल. हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणारी कृषी व्यवस्था निर्माण केली नाही, तर देशाच्या अन्नसुरक्षेसमाेर माेठे संकट उभे राहू शकते.