गोंदिया,
two cattle die गौसंरक्षण आणि गौसेवेचा संदेश देण्यासाठी एकीकडे विविध उपक्रमांचा गजर सुरू असतानाच दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणार्या गोवंशांची अपघातात होणारी जीवितहानी कायम आहे. रविवारी, ३० ऑगस्ट रोजी सकाळी शहरातील तीन वेगवेगळ्या मार्गांवर अज्ञात वाहनांच्या धडकेत दोन गोवंशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गोवंश गंभीर जखमी झाला. या घटनांनी गौसेवेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील प्रमुख मार्गांवर रात्रीच्या वेळी मोकाट गोवंशांचा मुक्त संचार असतो. अनेकदा हे गोवंश रस्त्याच्या मधोमधच बसून राहत असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. परिणामी अपघात घडतात. यापूर्वीदेखील अशा घटनांमध्ये अनेक गोवंशांचा जीव गेला असून, वाहनचालकांनाही अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत. गौसेवेचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी सामाजिक संघटनांकडून विविध अभियान राबविले जात आहेत. मात्र, रस्त्यावर जखमी अवस्थेत तासन्तास तडफडणार्या गोवंशांकडे प्रशासनाचे किती लक्ष आहे, हा प्रश्न या घटनांमुळे ऐरणीवर आला आहे.
अपघातानंतर जखमी गोवंशाची माहिती मिळताच गौसेवक घटनास्थळी धाव घेतात आणि उपचाराची व्यवस्था करतात. मृत्यू झाल्यास अंत्यविधीची जबाबदारीही तेच पार पाडतात. मग मोकाट गोवंशांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासनाची ठोस उपाययोजना कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुडवा मार्गावर एका गोवंशाला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात त्याचा पाय मोडून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर सिंधी स्कूलसमोर आणि फुलचूर-आमगाव मार्गावर दोन स्वतंत्र अपघात झाले. या दोन्ही घटनांमध्ये दोन गोवंशांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गौसेवकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गोवंशाला उपचारासाठी हलविले.
‘गौसन्मान आव्हान’ अभियान ...
गौसंरक्षण, गौसंवर्धन आणि गौसेवेचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी जिल्ह्यात ‘गौसन्मान आव्हान’ अभियान सुरू करण्यात आले आहे. डॉ. प्रशांत कटरे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविले जात आहे. २९ ऑगस्ट रोजी कुडवा येथील गायत्री मंदिरात जिल्हास्तरीय बैठकही घेण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांनी गौसेवेचा निर्धार केला. ग्रामपंचायत स्तरावर गौसेवेसाठी सक्रिय पथके तयार करण्याचे काम सुरू असून, आठवड्यातील एक दिवस प्रत्येकाने गौसेवा आणि जनजागृतीसाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अभियानाच्या घोषणांसोबतच रस्त्यावर मोकाट फिरणार्या गोवंशांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. अन्यथा ‘गौसेवेचे दावे आणि रस्त्यावर गोवंशांची तडफड’ हे विरोधाभासी चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.