मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान!

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
ताश्कंद,
uzbekistans highest honor for modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्झियोयेव यांनी एका विशेष समारंभात पंतप्रधान मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव केला. ताश्कंद येथे मोदी आणि मिर्झियोयेव यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि उझबेकिस्तानच्या शिष्टमंडळांमध्ये झालेल्या चर्चेत आर्थिक सहकार्य, व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सामरिक भागीदारी या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. दोन्ही देशांचे संबंध व्यापक सामरिक भागीदारीच्या दिशेने पुढे नेण्यावर यावेळी भर देण्यात आला.
 
uzbekistans highest honor for modi
 
चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांनी सहकार्याच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. परस्पर सहकार्याच्या सर्व बाबींना दिशा देण्यासाठी परराष्ट्र मंत्री स्तरावर समन्वय परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भारत-उझबेकिस्तान संयुक्त आयोगाची पातळी सचिव स्तरावरून वाढवून मंत्री स्तरावर करण्याचे निश्चित करण्यात आले. दोन्ही देशांतील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणण्यासाठी संयुक्तपणे व्यावसायिक शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. याशिवाय, युरेनियमच्या पुरवठ्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान तीन भगिनी-शहर आणि भगिनी-राज्य व्यवस्था सुरू करण्याचेही ठरले असून, या सहकार्याचा पूर्ण उपयोग करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज मोदी यांनी व्यक्त केली.
 
उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या ‘न्यू ताश्कंद’सारख्या मोठ्या प्रकल्पांचा संदर्भ देताना मोदी यांनी भारतातील गुजरातमधील गिफ्ट सिटीचा उल्लेख केला. तंत्रज्ञानाच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी उझबेकिस्तानमधील शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रपती शवकत मिर्झियोयेव यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत करत असलेल्या प्रगतीचे कौतुक केले. भारत उच्च आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवत असून विविध मोठे प्रकल्प राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटलीकरण, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधनासह अनेक क्षेत्रांत भारताने उल्लेखनीय प्रगती केली असल्याचेही मिर्झियोयेव यांनी म्हटले. जागतिक स्तरावर भारताचा आवाज आणि प्रभाव अधिक बळकट झाल्याचे सांगत त्यांनी भारताच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी उझबेकिस्तानमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपती मिर्झियोयेव यांच्यासोबत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.