वर्धा,
wardha पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांना महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना पोलिस ठाणे चोपडा ग्रामीण येथे नोंद असलेल्या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
मात्र, सौरभ कुमार अग्रवाल यांनी व त्यांचे पथकाने सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक, विश्लेषण, अचूक पुरावे आणि साक्षीदारांची भक्कम साखळी मांडून उकल करून आरोपीला गजाआड केले. या उत्कृष्ट तपासाचे आधारे न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या कामगिरीची पोलिस महासंचालकांनी दखल घेऊन पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने २०२३ या कालावधीत सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी हा पुरस्कार अपर पोलिस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच पोलिस ठाणे सायबर जिल्हा वर्धा येथे कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे हे चंद्रपूर येथे कार्यरत असताना त्यांनी ५९ किलो गांजा पकडून दोन आरोपींविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास केला. दोन्ही आरोपींना न्यायलयाने आजन्म कारावाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाबाबत त्यांनाही सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी हा पुरस्कार अपर पोलिस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.