वैश्विक दायित्वाचे विराट चिंतन

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
rss chief mohan bhagvat उपनिषदातील या श्लोकाचा अर्थ असा की, हा आपला, तो परका असा विचार संकुचित मनाचे लोक करतात. विशाल हृदयाच्या लोकांसाठी संपूर्ण पृथ्वी ही परिवारासारखी असते. जिवात्मा आणि परमात्मा भिन्न नाही, असे सांगत अद्वैत वेदांत मांडणारे आदि शंकराचार्य ते ठिकठिकाणच्या मानवी समुदायांचे बाह्य रूप, संस्कृती किंवा धर्म वेगवेगळे असले, तरी अंतर्यामी सर्व मानव एकच आहेतङ्ख ही भारतीय दर्शन परंपरा. याच परंपरेने जगाला मानवता शिकविली आणि याच परंपरेने अनेक संघर्षांतून मानवी समुदायाला मार्ग दाखविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या अमेरिकेतील संबोधनात याच परंपरेची नव्याने मांडणी करून सध्याच्या संघर्षमय स्थितीत संपूर्ण जागतिक समुदायाच्या विचारांना नवी दिशा दिली आहे. सरसंघचालकांनी केलेल्या मांडणीचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी प्रत्येक जगातील मानवाचे दायित्व समजावून सांगितले आणि भारतावर एक दायित्व टाकले आणि ते सुद्धा जगाच्या संदर्भात. राष्ट्राच्या अस्तित्वाला एक व्यापक अर्थ असतो आणि प्रत्येक राष्ट्राची एक नियती असते, या स्वामी विवेकानंदांच्या विचाराची त्यांनी आठवण करून दिली. एकमेकांशी तंडत असलेल्या विविध देशांना वैविध्याच्या पलिकडच्या एकत्वाचा परिचय आणि अनुभव करून देणे ही भारताची नियती आहे, असे सरसंघचालक त्याच अर्थाने म्हणाले. भारतातील विविधतेबद्दल आपण सारे अभिमानाने बोलतो. पण, विविधतेबद्दल अभिमान बाळगणे आणि तिचा स्वीकार करून तिच्याबद्दल आदर बाळगणे हे व्यवहारात दिसले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
 
mohanji
 
सरसंघचालकांनी विविधतेतील एकतेच्या अनुषंगाने अमेरिकेच्या बहुलतेशी तुलना करीत जी मांडणी केली, तिचा मथितार्थ असा की, एकता म्हणजे सारखेपणा नव्हे. सर्वांनी एकाच भाषेत बोलणे, एकाच ईश्वराची उपासना करणे, एकाच प्रकारचे अन्न खाणे, एकाच राजकीय मतावर विश्वास ठेवणे किंवा एकाच सांस्कृतिक प्रतिमेत स्वतःला बसवणे म्हणजे एकता नव्हे. भारतीय विचारपरंपरेने कधीही विविधता आणि एकता यांना परस्परविरोधी मानले नाही. उलट, एकत्वाला अर्थच विविधतेमुळे प्राप्त होतो, असे भारतीय दर्शनाचे सांगणे आहे. आकाशात एकाच रंगाची उधळण असेल तर इंद्रधनुष्य साकारत नसते. एकच स्वर असेल तर संगीत निर्माण होत नसते. सारखेपणा नव्हे तर एकात्मता म्हणजे ऐक्य, हा विचार सरसंघचालकांच्या प्रतिपादनाच्या अधिष्ठानी आहे आणि आजच्या काळात समस्त भारतीयांनी तसेच जागतिक समुदायाने तो लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेच्या संदर्भात बहुलता, तर भारताबद्दल विविधतेतील एकता ही संकल्पना मांडली जाते. बहुलतावाद हा मुख्यतः व्यवस्थेचा मुद्दा आहे आणि मानवी समुदायाची एकात्मता हा त्यापेक्षा गहिरा असा मानवी अस्तित्वाशी निगडित असलेला मुद्दा आहे. अद्वैताच्या परंपरेत एक प्रश्न नेहमी चर्चेला येतो आणि तो असा की, एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसली तरी त्या परक्या नसतात. पण, दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापासून परका न मानण्याची अवस्था कायद्याने निर्माण करता येत नाही. हा मुद्दा उपदेशानेही सुटत नाही. तो सुटतो तो संस्कारांतून व विचारांतून. तसा संस्कार भारतीयांवर होत राहिला म्हणून विश्वात्मक पसायदान मागण्याच्या स्तरापर्यंत आपण येऊ शकलो. सरसंघचालकांचे आवाहन त्या दृष्टीने समजून घेतले पाहिजे.
आधुनिक जगाने माणसाला अभूतपूर्व स्वातंत्र्य दिले असले तरी अहंभाव आणि स्वार्थासारखे आजारही दिले आहेत. आधुनिक अर्थव्यवस्थेने आपल्याला ग्राहक बनविले आहे. राजकारण व्यक्तिंना मतदार तर सामाजिक माध्यमे ङ्कफॉलोअरङ्ख बनवतात. यात खुंटते ती माणूस बनण्याची आणि उन्नत होण्याची प्रक्रिया. कितीही भौतिक सुख मिळाले तरी त्यातून कायमस्वरूपी समाधान निर्माण होत नाही. इच्छा पुन्हा निर्माण होते, उपभोग पुन्हा सुरू होतो. भौतिक स्वरुपाच्या जगण्यातील ही विसंगती आपण सारे अनुभवतो आहोत. माणूस चंद्रावर पोहोचला, पण स्वतःच्या अस्वस्थतेपासून त्याची सुटका झाली नाही. त्याने जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाशी काही सेकंदांत संवाद साधण्याची साधने निर्माण केली, पण घरातील माणसाशी बोलण्यासाठी वेळ उरला नाही. त्याने कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण स्वतःच्या इच्छांची आणि भीतीची बौद्धिक चिकित्सा अजूनही पूर्ण झालेली नाही. अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा एकाच वैज्ञानिक सूत्रातून जन्माला येतात. सामाजिक माध्यमे ज्ञानाचे लोकशाहीकरण करू शकतात आणि त्याच वेळी द्वेषाचे औद्योगिकीकरणही करू शकतात. त्यामुळेच सरसंघचालकांनी हे लक्षात आणून दिले की, मानवजातीसमोरील पुढचा प्रश्न ङ्कआपण आणखी काय निर्माण करू शकतो?ङ्ख हा नाही. तो असा आहे की, आपण जे निर्माण करतो, त्याचा उपयोग कशासाठी करणार आहोत?
सरसंघचालकांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाला दिलेला संदेश विशेष अर्थपूर्ण आहे. भारताला जन्मभूमी आणि अमेरिकेला कर्मभूमी मानून, आपल्या कर्मभूमीशी निष्ठावान राहणे आणि तिथले कर्तव्य प्रथम पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने दिलेली मूल्ये आचरणातून जगणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. एखादा भारतीय अमेरिकेत किंवा कोणत्याही विदेशी भूमीत प्रामाणिकपणे काम करतो, कर भरतो, कायद्याचा आदर करतो, शेजाऱ्याशी चांगले वागतो, समाजासाठी योगदान देतो, विविधतेचा आदर करतो तेव्हा तो भारताची उज्ज्वल प्रतिमा निर्माण करीत असतो. अशा लोकांना कुठलाही ध्वज हातात घेण्याची किंवा रस्त्यावर येऊन ढोल बडवण्याची गरज नसते. भारतात राहणाऱ्या नागरिकांनीही सरसंघचालकांच्या या आवाहनाचे मर्म समजून घेतले पाहिजे. वसुधैव कुटुम्बकम हा विचार सुंदरच आहे. पण जीवनतत्त्व म्हणून त्याचा स्वीकार करणे तेवढे सोपे नाही. कारण कुटुंब चार-चौघांचे असो वा विश्वात्मक, त्यात केवळ प्रेम आणि सुखोपभोग नसतो; जबाबदाऱ्याही असतात. संपूर्ण मानवजात कुटुंब म्हणून जगायला लागली तर युद्धे होणार नाहीत. भूकेची समस्या ऊरणार नाही. सरसंघचालकांच्या अमेरिकेतील संबोधनाची संकल्पना विश्वात्मक एकात्मता ही होती. तो फक्त सामाजिक नव्हे तर नैतिक विचारही आहे. अस्तित्वाच्या पातळीवर आपण परस्परांशी जोडलेले असू, तर दुसऱ्याच्या विनाशातून आपलीही हानी होत असते हे मानव समुदायाला आता तरी समजले पाहिजे. जगाच्या एका भागातील अस्थिरता दुसऱ्या भागापर्यंत पोहोचते. आज जगाला महासत्तांची नव्हे तर मानवतावादी विचारांची गरज आहे. आपण वेगळे आहोत म्हणून आपण शत्रू आहोत, असा धोकादायक विचार अनेक भागांत बळावत आहे. सरसंघचालकांनी या मानसिकतेला थेट पर्याय दिला आहे आणि तो असा की बाह्य विविधतेचा स्वीकार करावा, पण अंतर्निहित एकत्वाचे विस्मरण होऊ नये! खरा मुद्दा असा आहे की, आपण विविधतेतून संघर्ष निर्माण करणार आहोत की शांततामय सहअस्तित्व? या प्रश्नाचे उत्तर जागतिक समुदायाला तसेच भारतीय नागरिकांनाही द्यावे लागेल. जगा आणि जगू द्या ही भावना मानवी सभ्यतेसाठी अपरिहार्य आहे. त्याउलट आमच्या आज्ञेप्रमाणे जगलात तरच तुम्हाला जगण्याचा अधिकार असेल, ही मानसिकता दडपशाही निर्माण करते. धर्माच्या नावाने, वंशाच्या नावाने, विचारसरणीच्या नावाने, राष्ट्राच्या नावाने माणसांनी माणसांवर प्रभुत्व मिळवण्याचे असंख्य प्रयोग केले. भारताच्या संतपरंपरेने मात्र शत्रूचा नाश करण्यापेक्षा शत्रुत्वाचा नाश व्हावा, अशी प्रार्थना केली. हा फरक सूक्ष्म आहे; पण सभ्यतेच्या पातळीवर अत्यंत गहन आहे. शत्रूचा नाश केला तर एक शत्रू कमी होतो. शत्रुत्वाचा नाश केला तर संघर्षाची मुळेच कमी होतात. आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात या विचारांची गरज किती आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच सरसंघचालकांनी अमेरिकेत केलेले संबोधन केवळ भारतीय समुदायापुरते मर्यादित राहत नाही. ते भारतीयांच्या निमित्ताने साऱ्या जगाशी संवाद साधणारे ठरते आणि स्वाभाविकच ते वैश्विक दायित्वाचे विराट चिंतन ठऱते.