मुंबई,
actress manasi parekh नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लड आणि भूस्खलनामुळे कैलास मानसरोवर यात्रेकरूंसह अनेक पर्यटक संकटात सापडले होते. या परिस्थितीत अभिनेत्री मानसी पारेखही अडकली होती. अखेर रविवारी ती सुखरूप मुंबईत परतली. मुंबई विमानतळावर पती आणि मुलीची भेट होताच मानसी भावूक झाली. अनेक दिवसांच्या चिंतेनंतर कुटुंबीय पुन्हा एकत्र आल्याने तिच्या डोळ्यांत अश्रू आले.
मानसी पारेख सदगुरूंच्या ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेली होती. चीनमधील नायलम, तिबेट परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने तिच्यासह इतर यात्रेकरूंचा प्रवास अडवला गेला. जवळपास चार तास त्यांना बसमध्येच थांबावे लागले. प्रशासनाने रस्ता मोकळा केल्यानंतर पुढील प्रवासाला परवानगी देण्यात आली.
मात्र त्यानंतरही यात्रेकरूंच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. चीनमधून सुमारे 40 मैलांचा प्रवास केल्यानंतर नेपाळच्या सीमेवर पुन्हा भूस्खलनामुळे मार्ग बंद झाला. पुढे जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने मानसीसह यात्रेकरूंना भूस्खलन झालेला रस्ता पायी पार करावा लागला. त्यानंतर काठमांडूपर्यंतचा बस प्रवासही मोठ्या अडचणींचा ठरला.
मुंबईत परतल्यानंतर मानसीने सोशल मीडियावर पोस्ट करत या संपूर्ण अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या. गेल्या 3-4 दिवसांचा काळ अत्यंत भावूक करणारा होता, असे तिने सांगितले. चीनमधून बाहेर पडून नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचणे म्हणजे युद्ध जिंकल्यासारखे वाटल्याचेही तिने म्हटले. अखेर मुंबईत परतून कुटुंबीयांना भेटता आले आणि मुलीला मिठी मारता आली, त्यामुळे या प्रवासातील सर्व त्रास विसरल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, नेपाळच्या नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीच्या (NDRRMA) माहितीनुसार, रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत देशात 2502 जण बेपत्ता होते. यामध्ये जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे 933 कर्मचारी, 592 परदेशी नागरिक आणि परदेशी ग्रुपसोबत प्रवास करणाऱ्या 127 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.