नाशिक
ashok kharat नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. अनेक महिलांचे शोषण करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे आरोप असलेल्या अशोक खरातचे अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून तो कारागृहात असून, त्याच्या जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे पीडितांसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात सध्या कारागृहात आहे. मार्च महिन्यात त्याचे कथित काळे कारनामे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यापैकी १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपविण्यात आला आहे.
आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. अशोक खरात प्रकरणात ॲड. निकम पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू मांडणार असून, जून महिन्यात सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. तपास यंत्रणेकडून प्रकरणातील पुरावे तसेच साक्षीदारांची माहिती न्यायालयासमोर सादर केली जाणार आहे. सरकार पक्षाकडून खरातच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे.
दरम्यान, कारागृहात असताना अशोक खरातच्या कथित विचित्र वर्तनामुळे पोलिस यंत्रणाही थक्क झाली आहे. कोठडीत बसून मंत्रजप करणे, विचित्र पुटपुटणे तसेच स्वतःच्या कृत्यांचे दैवी विधी म्हणून समर्थन करणे, अशा प्रकारचे त्याचे वर्तन समोर आले आहे. या माध्यमातून तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. मात्र, नाशिक पोलिस आणि एसआयटीने त्याच्याविरोधातील तपास अधिक तीव्र केला असून, त्याच्याभोवतीचा तपासाचा फास आणखी घट्ट केला आहे.आजच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, याकडे पीडितांसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.