धोकादायक इमारतीत विद्यार्थी गिरवतात ज्ञानाचे धडे

अल्पावधीतच इमारत झाली जीर्ण

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
राजुरा
dangerous- school building तालुक्यातील गोवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज धोकादायक इमारतीत ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. अल्पावधीतच ही इमारत जीर्ण झाली असून, वर्गाच्या इमारीतच्या छताचे सिमेंट-प्लास्टर निखळून पडत आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
rajura
 
तालुक्यातील गोवरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग असून, जवळपास 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही इमारत अल्पावधीतच जीर्ण झाल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवरही आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्गांमध्ये शिक्षण सुरू असताना छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर इमारतीच्या छताला गळती लागते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 
 
या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी गोवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मार्कंडी लांडे, उपाध्यक्ष सीमा जुनघरी, सुनील मादनेलवार, विनोद परसूटकर, प्रशांत उताणे, सोनाली जुनघरी, कोमल बल्की, नीलिमा ईखारे, साक्षी वाघमारे, शर्मिला कास्वटे यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी केली आहे.