नवी दिल्ली
New Delhi crime देशाची राजधानी दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरातून एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. नोएडाला जात असताना रस्ता चुकलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर एका रिकाम्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचे वृत्त आहे. ही घटना ४ ऑगस्टच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकरणी पोलिसांनी बसचालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.
पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी असून ती अकरावी इयत्तेत शिकत आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांवर नाराज असल्याने ती त्यांना न सांगता नोएडातील चुलत बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून परी चौक येथे उतरली. त्याच वेळी तेथून एक रिकामी स्लीपर बस जात होती.विद्यार्थिनीने बस थांबवण्याचा इशारा केल्यानंतर बस थांबली. यावेळी वाहकाने तिच्याकडे अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. चालक आणि वाहकाने तिला बसमध्ये घेतले आणि आपण नोएडा सेक्टर ६३ येथे जात असल्याचे सांगितले. मात्र, बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच वाहकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केल्याचे तिच्या म्हणण्यानुसार समोर आले आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर चालक आणि वाहकाने तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचा आरोप आहे. रात्री उशिरा आरोपींनी तिला काश्मिरी गेट बस स्थानकाजवळील रिंग रोडवर उतरवले आणि तेथून फरार झाले.अवस्थेत विद्यार्थिनीने काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून दोन्ही आरोपींना तिमारपूर येथील बस पार्किंगमधून अटक केली. या घटनेत वापरण्यात आलेली स्लीपर बसही पोलिसांनी जप्त केली असून तिची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.पोलिसांच्या सूत्रांनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर आरोपींनी ती दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील एका वर्कशॉपमध्ये नेली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर चालक आणि वाहक ही रिकामी बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने निघाले होते. याच प्रवासादरम्यान परी चौक येथे त्यांची विद्यार्थिनीसोबत भेट झाली. परी चौक ते काश्मिरी गेटदरम्यान बसने सुमारे ४७ किलोमीटरचा प्रवास केला. बस स्लीपर प्रकारातील असल्याने तिच्या आतील भागाला पडदे होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तींना बसच्या आत काय सुरू आहे, हे दिसत नव्हते.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील भजनपुरा परिसरात सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटनाही समोर आली होती. राजधानीतील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.