महाराष्ट्राच्या महिला कुस्तीपटूंची दमदार कामगिरी
दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
maharashtras-female-wrestlers भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या निवड चाचण्यांमध्ये हरयाणाचे वर्चस्व राहिले आणि अनेक कुस्तीपटूंनी अव्वल स्थान पटकावले, तर महाराष्ट्रानेही विविध वजनी गटांत दमदार कामगिरी केली. निवड चाचण्यांनंतर, अमेरिकेत होणाऱ्या आगामी २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी महिला संघाची अंतिम निवड केली आहे. 
दिवसभर चाललेल्या या चाचण्यांमध्ये कुस्तीपटूंनी सर्व १० वजनी गटांत स्पर्धा केली. यामध्ये हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या कुस्तीत आघाडीवर असलेल्या राज्यांतील खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी जोरदार लढत दिली. आपल्या वजनी गटातील विजेते खेळाडू आगामी जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील, तर उपविजेते खेळाडू राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊन सराव भागीदार म्हणून मदत करतील आणि संघाची ताकद वाढवतील. निवड झालेले कुस्तीपटू आपापल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी रवाना होण्यापूर्वी एका सखोल तयारी शिबिरासाठी एकत्र येतील.
परवीनने ५० किलो वजनी गटात अव्वल स्थान मिळविले, तर स्वीटी ५३ किलो गटात विजयी ठरली. महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदेने ५५ किलो गटात अव्वल स्थान पटकावले आणि नेहा शर्मा ५७ किलो गटात प्रथम आली. कोमलने ५९ किलो गटात अव्वल स्थान मिळविले, तर नेहा ६२ किलो गटात विजयी ठरली. वैष्णवी पाटील हिने ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर मानसी लाथेर हिने ६८ किलो गटात अव्वल स्थान मिळविले. महाराष्ट्राच्या अमृता पुजारीने ७२ किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला, तर दीक्षा मलिकने ७६ किलो गटात अव्वल स्थान पटकावले.