नवी दिल्ली
income tax department action आयकर विभागाने कर चुकवेगिरी, उत्पन्न व कमाईच्या तुलनेत आढळलेल्या तफावतीची दखल घेत पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि चंदीगडमधील ९२६ जणांना नोटीस बजावली आहे. यामध्ये व्यावसायिक, उद्योगपती आणि विविध संस्थांचा समावेश आहे. नोटिसांना प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्येक प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे.
आयकर रिटर्नच्या मूल्यांकनादरम्यान अनेक करदात्यांचे व्यवसाय सातत्याने वाढत होते आणि नफा चांगला होता, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांनी नोंदवलेले उत्पन्न आणि कर दायित्व कमी होत होते. ही प्रकरणे संशयास्पद मानून, संबंधित व्यवसायांच्या आर्थिक नोंदींची सविस्तर चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, आयकर विभागाने करदात्यांनी दाखल केलेले जीएसटी रिटर्न आणि इतर आर्थिक कागदपत्रांची देखील जुळवणी केली. व्यावसायिक व्यवहार, जीएसटीमध्ये घोषित केलेली उलाढाल आणि आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले उत्पन्न यामध्ये तफावत आढळल्याने ९२६ प्रकरणांमध्ये करदात्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. विविध व्यावसायिक संस्थांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. रिटर्न, टीडीएस आणि इतर आर्थिक कागदपत्रांमधील तफावतीची प्रकरणेही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती एका आयकर अधिकाऱ्याने दिली.
विवरणपत्रांच्या तपासणीत आढळला घोळ
काही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, काही कंपन्यांच्या टीडीएस प्रक्रियेत तफावत आढळून आली आहे. कर्मचारी, व्यावसायिक भागीदार किंवा इतर संबंधित पक्षांना केलेल्या देयकांवर नियमांनुसार टीडीएस कापला गेला आणि जमा केला गेला आहे की नाही, याची विभाग चौकशी करत आहे. प्रत्येक प्रकरणात कागदपत्रे आणि विवरणपत्रांची तपासणी केली जात आहे. ज्या करदात्यांना नोटीस मिळेल, त्यांना त्यांची बाजू आणि संबंधित कागदपत्रे विभागाकडे सादर करावी लागतील.