खोल समुद्रातील मोहिमांसाठी भारतीय नौदलाची नवी ताकद

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
मुंबई
ins nipun joins indian navy भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज, सोमवारी, खोल समुद्रातील अत्यंत आव्हानात्मक मोहिमा पार पाडण्याची क्षमता असलेले ‘INS निपुण’ हे विशेष जहाज दाखल होत आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये या जहाजाचा औपचारिकरित्या नौदलात समावेश केला जाणार आहे. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता असलेल्या या जहाजाच्या मदतीने समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह नौसैनिकांना बाहेर काढणे, तसेच समुद्राखाली बिघडलेली जहाजे किंवा यंत्रसामग्री दुरुस्त करणे शक्य होणार आहे.
 

 ins nipun joins indian navy, boosting deep-sea rescue and underwater operations 
‘INS निपुण’ हे सामान्य युद्धनौका नसून खोल समुद्रातील जटिल लष्करी आणि बचाव मोहिमांसाठी विशेष क्षमतांनी सज्ज करण्यात आले आहे. या जहाजाचा सुमारे ७५ टक्के भाग पूर्णपणे स्वदेशी आहे. त्याच्या निर्मितीत भारतीय उद्योग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (MSME) मोठा सहभाग आहे. त्यामुळे खोल समुद्रातील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या क्षमतांच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
समुद्राच्या पृष्ठभागावर नव्हे, तर त्याखालील आव्हानात्मक परिस्थितीत ‘निपुण’ची खरी क्षमता दिसून येणार आहे. खोल पाण्यात गोताखोरी, पाणबुडी बचाव, समुद्राच्या आत निगराणी आणि मलबा हटविण्यासारख्या अत्यंत कठीण मोहिमांची जबाबदारी या जहाजावर असेल. सामान्य जहाजांची पोहोच ज्या ठिकाणी मर्यादित होते, अशा खोल समुद्रातील भागात ‘निपुण’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
खोल समुद्रातील बचावकार्यासाठी हे जहाज मदर शिप म्हणूनही काम करू शकते. समुद्रात अडकलेल्या पाणबुडीतील नौसैनिकांना बाहेर काढण्याची क्षमता त्यात आहे. अत्याधुनिक गोताखोरी प्रणालींमुळे समुद्राच्या खोल भागात दीर्घकाळ सुरक्षितपणे काम करणे शक्य होणार आहे. समुद्राच्या पृष्ठभागाखालीच जहाजे किंवा यंत्रसामग्रीची दुरुस्ती करण्याची क्षमता या जहाजात आहे. तसेच समुद्रातील मलब्याचा शोध घेणे आणि हरवलेल्या यंत्रसामग्रीला बाहेर काढणे यांसारखी कामेही ‘INS निपुण’ करू शकते.
याशिवाय, पाण्याखाली कार्य करणाऱ्या रिमोट-कंट्रोल रोबोट्सने हे जहाज सुसज्ज आहे. त्यांच्या मदतीने समुद्राच्या अत्यंत खोल भागात निगराणी ठेवणे आणि आवश्यक माहिती व डेटा संकलित करणे शक्य होणार आहे. जहाजात आधुनिक डायनॅमिक पोझिशनिंग प्रणालीही बसविण्यात आली आहे. त्यामुळे समुद्राच्या वेगवान लाटा किंवा खराब हवामान असतानाही जहाजाला पाण्यावर स्थिर ठेवून मोहिमा पार पाडता येणार आहेत.
दरम्यान, भारतीय नौदलाने यापूर्वी जुलैमध्ये ‘मालवन’ या पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात (Anti-Submarine Warfare) विशेष प्रावीण्य असलेल्या जहाजाचा आपल्या ताफ्यात समावेश केला होता. त्यानंतर आता खोल समुद्रातील बचाव, दुरुस्ती, गोताखोरी आणि निगराणी क्षमतांना बळकटी देणारे ‘INS निपुण’ नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. समुद्राच्या गाभ्यातील आव्हानात्मक मोहिमांसाठी आवश्यक असलेली विविध साधने आणि तंत्रज्ञान एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारे हे जहाज भारतीय नौदलाच्या क्षमतेत महत्त्वाची भर घालणार आहे.