मुंबई आंदोलनासाठी जरांगे पाटलांचा मोठा इशारा!

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
जालना,
jarange patil मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे. आजपासूनच मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करा आणि पुढील १२ दिवसांत टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल व्हा, असे त्यांनी म्हटले. सर्वांनी एकाच वेळी जाण्याऐवजी मित्र, नातेवाईक किंवा परिचितांकडे थांबून मुंबईत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारावा, असेही त्यांनी सांगितले.
 
jarange patil
 
जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपल्यासोबत थांबू नका, तर हळूहळू मुंबईकडे रवाना व्हा, असे आवाहन केले. मुंबईत आल्यानंतर आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्याकडे जाऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत आपल्या समाजाचे मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि परिचित असल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्याकडे जाऊन राहण्याचे आवाहन केले.
 
पोलिसांकडून अडवणूक किंवा ताब्यात घेतले गेल्यास घाबरू नका, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून किंवा एकाच पद्धतीने प्रवास न करता वेगवेगळ्या मार्गाने आणि टप्प्याटप्प्याने जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
आपले आंदोलन सुरू असून उपोषण सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. आपण स्वतःही मुंबईत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून अद्याप आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे आपले लक्ष असल्याचे सांगत, पोलिसांशी संघर्ष न करण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले.
 
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांबाबतही जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. मोठे गैरप्रकार केले तरी अशा लोकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी ‘दोन संविधान’ असल्याची टीका केली. मराठा समाजाने आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी मुंबईकडे जाण्याची तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.