नवी दिल्ली
kalka-shimla heritage railway हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाचा फटका कालका-शिमला हेरिटेज रेल्वेमार्गाला बसला आहे. कोटी आणि घुम्मन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने मार्गाचा काही भाग कमकुवत झाला. या घटनेनंतर नॉर्दर्न रेल्वेने दहा गाड्या रद्द केल्या असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, अडकलेल्या ३९१ प्रवाशांसह ४० रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे कालका येथे पोहोचविण्यात आले.
नॉर्दर्न रेल्वेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, कोटी आणि घुम्मन स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री झालेल्या भूस्खलनामुळे ट्रॅकचा एक भाग धोकादायकरीत्या कमकुवत झाला. शिमला-कालका युनेस्को जागतिक वारसा रेल्वेमार्गावरील ब्रिज क्रमांक ५७ जवळ ही घटना घडली. डोंगराचा काही भाग खचल्याने जोडणाऱ्या पुलाचा एक भाग उघडा पडला. परिस्थिती लक्षात येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले आणि प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था केली.
भूस्खलनानंतर येणाऱ्या चार गाड्या मार्गातच थांबविण्यात आल्या. सोलन, कोटी आणि धर्मपूर येथील ४०० हून अधिक प्रवासी आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना पाच बस आणि दोन टेम्पो ट्रॅव्हलरच्या माध्यमातून सुरक्षितपणे हलविण्यात आले. स्थानिक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविण्यात आले, तर सुमारे १२० प्रवाशांसाठी ट्रेन क्रमांक १३०५२ मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली. या गाडीची वेळ बदलून विशेषतः रात्री १.३० वाजता करण्यात आली होती.
नॉर्दर्न रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे संपूर्ण बचाव आणि स्थलांतर मोहीम सुरळीत पार पडली. कालका स्थानकावर पोहोचल्यानंतर कोणत्याही प्रवाशाने तक्रार केली नाही किंवा परताव्याची मागणी नोंदविली नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले.
दरम्यान, सोलन जिल्ह्यात रेल्वे रुळाच्या एका भागाखालील माती वाहून गेल्याने शिमला-कालका नॅरो गेज रेल्वेमार्गावरील दहा गाड्या रद्द करण्यात आल्या. या घटनेमुळे नेहमीच पर्यटक आणि प्रवाशांनी गजबजलेले शिमला स्थानक रविवारी मात्र तुलनेने शांत दिसून आले. यंदाच्या मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे कालका-शिमला हेरिटेज रेल्वेमार्गावरील सेवा अनेक वेळा बाधित झाली आहे.
९६ किलोमीटर लांबीचा शिमला-कालका रेल्वेमार्ग अत्यंत नयनरम्य, मात्र तितकाच आव्हानात्मक भूभागातून जातो. अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जाणारा हा मार्ग पर्यटकांसाठीही प्रमुख आकर्षण आहे. या रेल्वेमार्गावर १०२ बोगदे, ८०० पूल आणि तब्बल ९१९ वळणे आहेत.