श्रीनगर,
kashmiri pandit दहशतवाद्यांकडून मिळणाऱ्या ऑनलाईन धमक्यांमुळे काश्मिरी पंडित समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर खाेऱ्यातील अल्पसंख्याक शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दहशतवाद्यांच्या धमकीचे एक पत्र समोर आले आहे़ या पत्रात कर्मचाऱ्यांची नावे, फोन नंबर, घराचे पत्ते आणि वाहनांचे क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे़.
दरम्यान, प्रशासनाकडून जम्मू आणि काश्मीरमधील सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांना तोंडी घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे़ तथापि, खोऱ्यात मारल्या गेलेल्या काश्मिरी हिंदूंच्या जुन्या प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांना धमकी देणारे एक नवीन पोस्टरही समोर आले आहे़ काश्मीर खोऱ्यात पंतप्रधान विस्थापित याेजनेंतर्गत काम करणारे कर्मचारी आणि ’ऑल मायग्रंट डिस्प्लेस्ड एम्प्लॉईज असोसिएशन’चे उपाध्यक्ष, रंजन जोत्शी म्हणाले, या नवीन धमकीमुळे समाजात भीतीचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. कारणे दाखवा नोटीस मिळण्याच्या भीतीने अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. परंतु, खटला पुन्हा सुरू झाल्यानंतर मिळालेल्या अलीकडील धमकीसह सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे काही जण अजूनही कामावर परतण्यास तयार नाहीत. सुरक्षा हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.kashmiri pandit धमकीच्या पत्रांमुळे आम्ही चिंतीत आहोत़ कारण त्यात नावे, पत्ते आणि फोन नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती आहे़ कोणताही धोका टाळण्यासाठी आम्हाला आमच्या हालचाली मर्यादित ठेवाव्या लागेल, असेही ते म्हणाले़
शिबिरांमध्ये राहतात ६,००० काश्मिरी पंडित कर्मचारी
काश्मीरमध्ये पंतप्रधान पॅकेजअंतर्गत काम करणारे सुमारे ६,००० काश्मिरी पंडित कर्मचारी सुरक्षेच्या कवचाखाली संक्रमण शिबिरांमध्ये राहतात. यापूर्वी आलेल्या धमकीच्या पत्रांनंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या धमक्यांमागील नेटवर्कचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यासह वर्क-फ्रॉम-होम सुविधा देण्याची मागणी केली आहे.