कौशांबी,
massive explosion at firecracker warehouse उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात सोमवारी सकाळी फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. पिपरी आणि पुरमुफ्ती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या आदित्य यांच्या मालकीच्या गोदामात सुमारे सकाळी ११ वाजता अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, आसपासच्या अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही घरे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत चारपेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, मृत किंवा जखमींच्या संख्येबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्फोटामुळे निर्माण झालेल्या ढिगाऱ्यांमध्ये कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी मदत व बचाव पथकांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवण्यात आला असून बचावकार्याला प्राधान्य दिले जात आहे.
दरम्यान, गोदामात नेमका कशामुळे स्फोट झाला, तसेच तेथे किती प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला होता, याची चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
यापूर्वी कासगंजमधील नागला पाटिया गावाजवळील फटाक्यांच्या कारखान्यातही आग लागली होती. या घटनेत रेहान (१९), मोनू (२१), सुनील (१८) आणि अजय (२२) हे चार कामगार गंभीररीत्या भाजले होते. पोलीस अधीक्षक ओ. पी. सिंग यांनी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले होते.