मुंबई
kbc 18 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 18वा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात स्पर्धक आपल्या ज्ञानाच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करण्याचा प्रयत्न करतात. नुकत्याच झालेल्या भागात अमरावतीमधील प्रगती दिनेश कल्पेकर हिने हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला. मात्र, 12 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या ‘कोमागाता मारू’ जहाजाशी संबंधित प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने तिला 5 लाख रुपये घेऊन समाधान मानावे लागले.
प्रगतीने वेगवान प्रश्नांना अचूक उत्तरे देत हॉट सीटवर प्रवेश मिळवला. त्यानंतर तिने आपल्या संघर्षाची कहाणीही सांगितली. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते; मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. आता आयएफएस (IFS) अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे तिने सांगितले.
प्रगतीच्या कुटुंबावरही कठीण प्रसंग आले आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या काळात तिच्या वडिलांची चहाची टपरी हटवण्यात आली. त्यामुळे कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले. याच काळात प्रगतीला नोकरी मिळाली. सध्या ती अमरावती येथील सरकारी विभागीय माहिती कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.
प्रगती आपल्या कुटुंबातील आर्थिक अडचणींचा सामना करत असून, सध्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे. घराचे भाडे भरण्यापासून कुटुंबीयांसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यापर्यंतची जबाबदारी ती सांभाळते. आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले. याच स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रगती ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आली होती.
मात्र, 12 लाख रुपयांच्या प्रश्नावर दिलेल्या एका चुकीच्या उत्तरामुळे तिच्या हातातील रक्कम मोठ्या प्रमाणात कमी झाली. या प्रश्नाचे उत्तर देताना तिच्याकडे 50:50 ही लाइफलाइन उपलब्ध होती. मात्र, तिने ती न वापरण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या ज्ञानावर उत्तर देण्याचे ठरवले.
प्रगतीला विचारण्यात आलेला प्रश्न असा होता की, “कॅनडाच्या स्थलांतरविषयक नियमांना आव्हान देण्यासाठी 1914 मध्ये ‘कोमागाता मारू’ हे जहाज कोणी भाड्याने घेतले होते?” या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले होते. A. सोहन सिंह भकना, B. लाला हर दयाल, C. बाबा गुरदित सिंह आणि D. करतार सिंह सराभा.
प्रगतीने पर्याय ‘D’ म्हणजेच करतार सिंह सराभा हे उत्तर निवडले. मात्र, तिचे उत्तर चुकीचे ठरले. या प्रश्नाचे योग्य उत्तर ‘C. बाबा गुरदित सिंह’ हे होते. 12 लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याने प्रगतीला मोठी रक्कम गमवावी लागली आणि अखेर तिला 5 लाख रुपये घेऊनच घरी परतावे लागले.