तेहरान,
us iran conflict इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका आणि इस्रायलला इस्लामिक देशांचा शत्रू संबोधत त्यांनी मुस्लिम राष्ट्रांच्या नेत्यांनी ‘खरा शत्रू कोण आहे हे ओळखून त्याच्या योजना समजून घ्याव्यात आणि त्याचा सामना करावा’, असे म्हटले आहे.
इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, तेहरानमध्ये आयोजित एका धार्मिक परिषदेला उपस्थित नेत्यांना पाठवलेल्या पत्रातून खामेनी यांनी हे आवाहन केले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचे वडील तसेच इराणमधील अनेक वरिष्ठ नेते ठार झाले होते. त्यानंतर मोजतबा खामेनी सार्वजनिक जीवनात फारच कमी दिसले आहेत.
दरम्यान, इराणकडून शेजारील आखाती अरब देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. याशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याने या संघर्षाचा परिणाम संपूर्ण पश्चिम आशियावर होत आहे.
रविवारी अमेरिकन लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणी रॉकेट लाँचर्सवर हल्ला केला. जवळपास एका महिन्यानंतर इराणविरोधात अमेरिकेकडून करण्यात आलेली ही पहिली जाहीर लष्करी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेने हा हल्ला ‘मर्यादित आणि अचूक’ असल्याचे स्पष्ट करत इराणी सुरुंग पेरणाऱ्या तुकड्यांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला.
जॉर्डनच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे देशाच्या हवाई हद्दीत प्रवेश केलेली आठ क्षेपणास्त्रे रोखण्यात आली. दुसरीकडे, इराणच्या सरकारी माध्यमांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाचे व्हिडिओ प्रसारित करत हे हल्ले अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील लारक बेटाच्या परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचेही इराणी माध्यमांनी सांगितले. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने या घटनांमध्ये अनेक सैनिक आणि नागरिक ठार तसेच जखमी झाल्याचे वृत्त दिले आहे.
याचदरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका टँकरलाही क्षेपणास्त्राचा फटका बसला. ब्रिटिश लष्कराद्वारे चालवल्या जाणाऱ्या युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सच्या माहितीनुसार, शनिवारी ओमानमधील खसाबच्या उत्तरेकडील समुद्रात अज्ञात क्षेपणास्त्र टँकरवर आदळले. जहाज भूभागाच्या दिशेने जात होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.