तिवसा
victim-of-mahavitarans-negligence रविवारी, ३० ऑगस्टला महावितरणच्या वीजवाहिनीची तार तुटून खाली पडल्याने त्याला स्पर्श होऊन चेनुष्ठा येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पण सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत मृताचे नातेवाईक नुकसानभरपाईसाठी अडून बसले होते. अखेर महावितरणच्या लेखी आश्वासनानंतरच नातेवाईकांनी मृत शेतकरी अशोक आमले यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
शेतकरी अशोक शेषराव आमले (६५) यांचा शेतात तुटून पडलेल्या वीज प्रवाह असलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने रविवार, ३० ऑगस्टला दुपारी ४ च्या सुमारास जागीच मृत्यू झाला होता. अशोक आमले रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतातील कामासाठी घरून निघाले होते. शेतात पोहोचल्यानंतर काम करीत असताना शेताच्या कुंपणावर विद्युत वाहिनी तुटून पडली होती. या वाहिनीत वीजप्रवाह असल्याने तो कुंपणाच्या तारेत उतरला होता. काम करताना कुंपणाचा तार त्यांच्या पायात अडकल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अशोक आमले यांचा मृतदेह विच्छेदनासाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, महावितरण कंपनीकडून कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आमले कुटुंबीयांनी घेतला. रविवारी कुटुंबीयांनी केलेल्या मागण्यांवर सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत महावितरण कंपनीकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आमले कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तिवसा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाकडे धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. अखेर बऱ्याच चर्चेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याचे कबूल केले व नातेवाईकांनी अशोक आमले यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला.
आमले यांच्या मृत्यूबाबत महावितरणकडून शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला पात्रतेनुसार नोकरीत सामावून घेण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबतचे लेखी पत्र आमले कुटुंबीयांना देण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यात येत आहे.-जीवन बमनोटे
सहायक अभियंता, महावितरण, कुऱ्हा