दिल्लीच्या मतदार यादीत मोठी छाटणी!

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
massive pruning of delhis voter list निवडणूक आयोगाकडून देशभरात मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरावलोकन अर्थात SIR सुरू असताना दिल्लीतील मसुदा मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत दिल्लीतील एकूण १,४५,१०,२९९ मतदारांपैकी ४७.७ लाख मतदारांची नावे मसुदा यादीत दिसत नाहीत. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
 
massive pruning of delhis voter list
 
SIR प्रक्रियेचा उद्देश पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये आणि अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश राहू नये, हा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दिल्लीतील नव्या मसुदा यादीत अंदाजे ९७.५ लाख मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित ४७.७ लाख मतदारांना ‘गैरहजर, हस्तांतरित, मृत, दुबार आणि इतर’ म्हणजेच ASDDO श्रेणीत टाकण्यात आले असून त्यांना मसुदा यादीत स्थान देण्यात आलेले नाही.
 
दिल्लीतील SIR अंतर्गत घरोघरी जाऊन गणना अर्ज आणि मतदारांची माहिती जमा करण्याचे तसेच ती डिजिटल करण्याचे काम ३० जूनपासून सुरू झाले होते. ही प्रक्रिया १७ ऑगस्टला पूर्ण झाली. या कालावधीत दिल्लीतील एकूण मतदारांपैकी सुमारे ६७.१८ टक्के मतदारांचे गणना अर्ज डिजिटल करण्यात आले. मात्र, उर्वरित ४७.७ लाख मतदारांची माहिती संकलित होऊ शकली नसल्याने त्यांना ASDDO प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले.
 
मसुदा यादीत नाव नसलेल्या मतदारांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. संबंधित मतदार ३० सप्टेंबरपर्यंत फॉर्म ६ आणि आवश्यक कागदपत्रांसह आपला दावा दाखल करू शकतात. त्यानंतर दाखल झालेले दावे आणि आक्षेप तपासले जातील. निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, नोटीस आणि निकालाची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
 
दिल्लीतील SIR अंतर्गत अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी झारखंडमध्येही SIR अंतर्गत मसुदा मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. तेथे ४३ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली होती.