नरेंद्र मोदींच्या कवितांनी गाजला उझबेकिस्तान दौरा

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
ताश्कंद,
narendra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात राजनैतिक चर्चांसोबतच एक अनोखा सांस्कृतिक क्षणही पाहायला मिळाला. ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी मोदी यांनी लिहिलेल्या तीन कवितांचे उझबेक भाषेत भाषांतर करून त्यांचे सादरीकरण केले. हिंदीसोबत उझबेक भाषेतही या कविता सादर करण्यात आल्याने हा कार्यक्रम विशेष ठरला.
 
narendra modi
 
उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींनी कुक्सरॉय पॅलेसमध्ये आयोजित केलेल्या अनौपचारिक भोजनादरम्यानही मोदींच्या कवितांवर आधारित विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अभी तो सूरज उगा है’ या कवितेवर आधारित सादरीकरणाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मोदींच्या कवितांचे हे सादरीकरण त्यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यातील लक्षवेधी क्षणांपैकी एक ठरले. ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये विद्यार्थी आणि शैक्षणिक समुदायासोबत झालेल्या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी मोदींच्या तीन कविता सादर केल्या. चौथ्या वर्षाचा विद्यार्थी केल्दियोरोव दिलहुशबेक याने ‘अभी तो सूरज उगा है’ ही कविता हिंदीत सादर केली, तर तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी दिलशोदा जुराबोएवा हिने तिचे उझबेक भाषांतर सादर केले.
 
‘नव्या भारताचा नवा संकल्प’ या कवितेचेही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. चौथ्या वर्षाचा विद्यार्थी ओटाबेक अमिरोव्ह याने ही कविता हिंदीत सादर केली. तिचे उझबेक भाषांतर विद्यापीठातील तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी इक्रोमखुजा सादिल्लायेव्ह याने सादर केले. मानवता, दयाळूपणा आणि शांततेचा संदेश देणारी ‘मानवता को कहीं ना लग जाये दाग’ ही तिसरी कविता देखील कार्यक्रमात सादर करण्यात आली. तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ओर्झू कुलदोशेवा हिने ती हिंदीत सादर केली, तर तिचे उझबेक भाषांतर तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी फायोझा अब्दुरासुलोवा हिने केले. मोदींच्या कवितांचे दोन्ही भाषांमध्ये झालेले हे सादरीकरण उझबेकिस्तानमधील त्यांच्या दौऱ्यातील सांस्कृतिक संवादाचा विशेष भाग ठरला.