नेपाळच्या महापुरात ५० कोटींचे सोने आणि दीड कोटींची रोकड सापडली

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
काठमांडू
nepal flood disaster नेपाळमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडालेला असतानाच बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. दरम्यान, नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली येथील कृषी विकास बँकेच्या शाखेतून तब्बल ५० कोटी रुपयांचे सोने आणि दीड कोटी रुपयांची रोकड सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आहे. भोटेकोशी नदीला आलेल्या महापुराच्या तडाख्यात बँकेची ही शाखा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती.
 

nepal flood disaster 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुमारे आठ तास सातत्याने प्रयत्न केल्यानंतर बँकेच्या शाखेतून सोने-चांदी, रोकड तसेच इतर महत्त्वाचे साहित्य बाहेर काढण्यात यश आले. पूरग्रस्त भागातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन बचाव पथकाने अत्यंत सावधगिरीने ही मोहीम राबवली.
नुवाकोटच्या त्रिशूली येथील कृषी विकास बँकेची शाखा भोटेकोशी नदीच्या काठावर आहे. २६ ऑगस्ट रोजी नदीला आलेल्या महापुराने परिसरात मोठी हानी झाली. पुराचे पाणी बँकेच्या शाखेत शिरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पुराच्या प्रवाहात बँकेतील रोकड तसेच सोने-चांदी वाहून गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.पूर ओसरल्यानंतर बचावकार्यादरम्यान पथकाने बँकेच्या शाखेत शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड आढळून आली. सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ५० कोटी रुपयांचे सोने आणि दीड कोटी रुपयांची रोकड बाहेर काढण्यात आली.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावलेल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. भोटेकोशी नदीच्या पुराच्या तडाख्यात बँकेची शाखा सापडल्याने बँक परिसरासह आजूबाजूच्या भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.बँकेतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोकड सापडल्याने हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली जप्त करण्यात आलेले मौल्यवान साहित्य सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पुरामुळे बाधित झालेल्या विविध भागांत मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरू आहे.