जिल्ह्यात यादीनुसार ९ लाख ५९ हजारांवर मतदार : जिल्हाधिकारी

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-sir भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आणि वगळलेल्या मतदारांची यादी आज ३१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात
९ लाख ५९ हजारांवर मतदार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले.

sir
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित तसेच राजकीय पक्षांचे प्रा. खलील खतीब, अविनाश मांडे, आशिष देशमुख, भय्याजी देशमुख, प्रवीण चोरे, मनोजकुमार देशमुख, यशवंत झाडे, पंकज सत्यकार, मिलन गांधी, राजु वरटकर उपस्थित होते.
जिल्ह्यात मतदार यादीचा पहिला टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडला. विविध कारणाने जवळजवळ १५ टक्के मतदार प्रारुप यादीत समाविष्ठ होऊ शकले नाही. त्यातील जे मतदार यादीत समाविष्ठ होऊ शकतात, अशा मतदारांच्या समावेशासाठी प्रशासनासोबतच राजकीय पक्षांनी देखील सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
प्रारुप यादीवर मतदारांना आक्षेप असल्यास तशी सुविधा देण्यात आली आहे. वेळेत आक्षेप सादर करण्यात यावे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
 
प्राप्त माहितीच्या पडताळणीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यात ९ लाख ५९ हजार ६४ मतदारांचा समावेश आहे. सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात १ लाख ७८ हजार १७८ अर्ज हे मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदींमुळे गोळा होऊ शकले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने मृत व्यक्ती ४७ हजार ६८८, पत्ता न सापडलेले किंवा अनुपस्थित १० हजार ३०२, कायमचे स्थलांतरित ९५ हजार ८९, पूर्वीच नोंदणीकृत २४ हजार ८४१ व इतर २५८ नोंदींचा समावेश आहे.