तारखा बदलून जुने अन्न विकणाऱ्या कारखान्यावर धाड

तुर्भे परिसरातून ७५ लाखांचा मुदतबाह्य साठा जप्त

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |

 

त. भा. वृत्तसेवा

मुंबई

expired-food-stock-raid नवी मुंबईतील तुर्भे येथे नागरिकांच्या जिवाशी खेळणारा एक भयंकर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुदत संपलेल्या (खराब झालेल्या) अन्नपदार्थांच्या वेष्टनावरील जुन्या तारखा पुसून, त्यावर नव्या तारखा छापणाऱ्या एका महाठग टोळीचा 'अन्न व औषध प्रशासन' आणि 'नवी मुंबई गुन्हे शाखेने' संयुक्त कारवाईत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ७५ लाख २१ हजार २६९ रुपये किमतीचा मुदतबाह्य अन्नाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 
fda
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक आदेशानुसार, २४ ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान तुर्भे औद्योगिक वसाहतीमधील 'मे. साधना एंटरप्रायजेस' या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात भागीदार जयप्रकाश सिंग आणि जया सिंग यांच्या गोदामात अनेक नामवंत निर्यातदार कंपन्यांचे मुदतबाह्य अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे उघड झाले. या पदार्थांच्या मूळ वेष्टनावरील 'उत्पादन तारीख' आणि 'मुदत संपण्याची तारीख' शिताफीने पुसून त्यावर नव्या खोट्या तारखा छापल्या जात होत्या. एवढेच नाही, तर अन्नातील घटक आणि पोषण मूल्यांच्या माहितीवरही नव्या चिठ्ठ्या लावून हे फेरफार केलेले अन्न पुन्हा ग्राहकांच्या माथी मारले जात होते. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर गुन्ह्याप्रकरणी 'अन्न सुरक्षा व मानके कायदा' आणि 'भारतीय न्याय संहिता' अंतर्गत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हेगारांविरुद्ध थेट प्रथम खबरी अहवाल (गुन्हा) दाखल करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित कंपनीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


७५ लाखांचे ५ हजार खोके जप्त

या धडक कारवाईत १० मोठ्या आणि नामवंत निर्यातदार कंपन्यांशी संबंधित एकूण ४,९४२ खोके जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये लहान मुलांच्या आवडीचे प्रसिद्ध बटाटा वेफर्स, नूडल्स, तयार अन्न आणि थंड पेयांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कोणतीही माहिती नसलेला आणि मुदत संपलेला हजारोंचा मालही अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.