लॉर्ड्सवर रूटची ऐतिहासिक कामगिरी

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
लॉर्ड्स,
roots historic performance at lords पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने १९४ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. आशियाई संघांविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा इंग्लंडचा कर्णधार म्हणून रूटने माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसला मागे टाकले आहे.
 
roots historic performance at lords
 
आशियाई संघांविरुद्ध रूटने आतापर्यंत २२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व केले असून, त्यापैकी १५ सामन्यांत संघाला विजय मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम अँड्र्यू स्ट्रॉसच्या नावावर होता. स्ट्रॉसने २२ कसोटी सामन्यांत कर्णधारपद भूषवताना १४ विजय मिळवले होते. अॅलिस्टर कूक ३० सामन्यांत १२ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नासिर हुसेन आणि बेन स्टोक्स यांच्या नावावर प्रत्येकी सात विजय असून ते संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत.
 
लॉर्ड्स कसोटीमध्ये इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या ११० धावांत संपल्याने इंग्लंडला १८० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ २०८ धावांवर सर्वबाद झाला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी ३८९ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, पाकिस्तानचा दुसरा डाव १९४ धावांवर आटोपला आणि इंग्लंडने सामना १९४ धावांनी आपल्या नावे केला.
 
पाकिस्तानच्या फलंदाजीसाठी ही कसोटी मालिका अत्यंत निराशाजनक ठरली आहे. कसोटी इतिहासात प्रथमच पाकिस्तानचा संपूर्ण संघ सलग चार डावांत २०० धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरला आणि प्रत्येक डावात सर्वबाद झाला. लीड्स कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात १७१, तर दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या होत्या. आता मालिकेतील तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा होते का, याकडे लक्ष लागले आहे. इंग्लंडचा संघ मात्र मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.