रशियावर इंधन संकट; भारत संकटमोचक

युक्रेन युद्धामुळे तेल आयातीची नामुष्की; १० लाख बॅरल पेट्रोलचा पुरवठा

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
russia fuel crisis तेलाची निर्यात करणाऱ्या रशियावर युक्रेन युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आयात करण्याची नामुष्की आली आहे. युक्रेनच्या हल्ल्यामुळे तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे मोठे नुकसान झाल्याने रशियाला भारतासह इतर देशांकडून इंधनाची आयात करावी लागत आहे. संकटाच्या काळात भारताने मदतीचा हात देत रशियाला ऑगस्ट महिन्यात १० लाख बॅरल पेट्रोलचा पुरवठा केला.
 

russia fuel crisis india supplies 1 million barrels of petrol amid ukraine war 
सध्याच्या परिस्थितीत भारत रशियाला पेट्रोलचा मोठा पुरवठा करणारा देश बनला आहे. युक्रेनकडून रशियाच्या तेल रिफायनरीजवर सातत्याने होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे देशातील इंधन उत्पादनावर परिणाम झाला आहे. देशांतर्गत इंधन उत्पादन घटल्याने ऑगस्टमध्ये रशियाची समुद्रमार्गे पेट्रोल आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. या काळात भारत रशियाला पेट्रोल पुरवठा करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक ठरला आहे. रशियाने ऑगस्टमध्ये सागरी मार्गाने दररोज अंदाजे १,२५,००० बॅरल पेट्रोल आयात केले. संपूर्ण महिन्यासाठी हे प्रमाण अंदाजे ४,७०,००० टन आहे. भारतीय रिफायनरींनी महिनाभरात रशियाला १० लाख बॅरल पेट्रोलचा पुरवठा केला. यामध्ये नायरा एनर्जीद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुजरातमधील वडीनार रिफायनरीतून सर्वाधित तेलाची निर्यात करण्यात आली.
उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट
मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे इतर देशांकडून होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे भारताची रशियन कच्च्या तेलाची खरेदी विक्रमी पातळीवर पोहोचली. जून आणि जुलैमध्ये भारताने दररोज २६ लाख बॅरलपेक्षा अधिक रशियन कच्चे तेल आयात केले. जगातील प्रमुख कच्च्या तेल निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या रशियाला सध्या पेट्रोल आयात करण्याची वेळ आली आहे. युक्रेनकडून ऊर्जा पायाभूत सुविधांवर आणि रिफायनरीजवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे देशांतर्गत पेट्रोल उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यामुळे रशियामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
निर्यातीवर निर्बंध
रशियाने जुलैमध्ये उत्पादक आणि गैर-उत्पादक अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांसाठी पेट्रोलच्या पूर्ण निर्यातीवरील बंदी जानेवारी २०२७ अखेरपर्यंत वाढवली आहे. त्याचवेळी डिझेलच्या निर्यातीवरील निर्बंध १ सप्टेंबर २०२६पर्यंत वाढवण्यात आले आहेत. आयात केलेल्या पेट्रोलपैकी जवळपास ५५ टक्के म्हणजे सुमारे २ लाख ६० हजार टन पेट्रोल प्रतिबंधित जहाजांद्वारे रशियात पोहोचले.