सिग्नलखाली भाजीचा बाजार ! पोलीस चौकी तरी कशासाठी?

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Sambhaji Chowk Encroachment संभाजी चौकातील (नागोबा मंदिर चौक) सिग्नलखाली चक्क भाजीचा तंबू! वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्याचा अर्धा भाग भाजी विक्रीसाठी बिनदिक्कत अडवून ठेवला असताना संबंधित यंत्रणा मात्र नेमकी कुठे आहे, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.नागोबा मंदिराकडून त्रिमूर्तीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर भाजी विक्रेत्या महिलेने थेट रस्त्यावरच आपला संसार थाटला आहे. भाजी घेण्यासाठी थांबणारे ग्राहक रस्त्यातच वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा खोळंबा अधिकच वाढतो.
 

kolar 
 
रस्ता अडवला तरी चालतो, पण अपघात झाला तर वाहनचालक दोषी ? असा बोचरा सवाल आता नागरिक विचारत आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबत जाब विचारल्यास उद्धटपणे अंगावर धावून जाण्याच्या तक्रारीही आहेत.विशेष म्हणजे, या चौकापासून प्रतापनगर पोलीस चौकी अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहे. तरीही सिग्नलखाली सुरू असलेला हा ‘भाजी बाजार’ पोलिसांना दिसत नाही की दिसूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सामान्य नागरिकांनी नियम पाळायचे, कर भरायचे आणि रस्ता अडविणाऱ्यांचा त्रास सहन करायचा; मग नियम नेमके कुणासाठी ? एखाद्या अपघातानंतर जागे होण्यापेक्षा संबंधितांनी तत्काळ कारवाई करून हे अतिक्रमण हटवावे, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे.
सौजन्य:सोनाली कोलारकर,संपर्क मित्र