मालिका रद्द नाही! भारत-बांगलादेश क्रिकेटचा नवा प्लॅन समोर

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
ढाका,
india bangladesh cricket revealed भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रस्तावित असलेल्या क्रिकेट मालिकेबाबत अखेर नवी माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट होते. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी मालिका रद्द झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात ही मालिका होण्याची शक्यता कायम आहे.
 
india bangladesh
 
भारताच्या बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेचे आयोजन करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दोन्ही तयार असल्याचे तमीम इक्बाल यांनी सांगितले. मात्र, नियोजित ऑगस्ट-सप्टेंबर कालावधीत सामने होणार नसून, दोन्ही बोर्ड आता मालिकेसाठी योग्य नवीन वेळ शोधत आहेत.
 
‘नॉट आऊट नोमान’ या क्रीडा मंचावर बोलताना तमीम इक्बाल यांनी सांगितले की, मालिकेच्या आयोजनाबाबत दोन्ही क्रिकेट बोर्ड सातत्याने संपर्कात आहेत. बांगलादेश बोर्डाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, मात्र काही बाबी त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष म्हणून आपल्या अधिकारांच्या मर्यादेतच राहून निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
दोन्ही संघांचे क्रिकेट वेळापत्रक आधीच व्यस्त आहे. बांगलादेशच्या आगामी काळात तीन मालिका नियोजित आहेत, तर भारतीय संघाचेही व्यस्त वेळापत्रक आहे. त्यामुळे दोन्ही बोर्डांना मालिकेसाठी योग्य कालावधी निश्चित करण्याचे आव्हान आहे. असे असले तरी भारत-बांगलादेश मालिका आयोजित करण्याची दोन्ही बोर्डांची तयारी कायम असल्याचे तमीम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
 
दरम्यान, बांगलादेशला मागील टी-२० विश्वचषकातून माघार घ्यावी लागल्याच्या निर्णयावरही तमीम इक्बाल यांनी भाष्य केले. सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या संपूर्ण प्रकरणात बांगलादेशने अधिक प्रभावी संवाद साधायला हवा होता, असे तमीम यांचे मत आहे. त्यानंतर २०२६ च्या आयपीएलमध्ये मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सकडून वगळण्यात आल्याने हा मुद्दा आणखी चर्चेत आला होता.