‘राज्य हौशी’मध्ये आता ‘स्थानिकां’चेच नाट्य!

कलाकारांच्या घुसखोरीला लगाम नव्या नियमांत स्थानिकतेची अट कठोर

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर
sthanikaan-drama महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांमध्ये परजिल्ह्यातील कलाकारांच्या सहभागाला आता चाप बसणार आहे. स्थानिक हौशी कलाकारांचे व्यासपीठ अबाधित राहावे, यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्पर्धांच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार, स्पर्धेतील कलाकार संबंधित जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

natya
राज्यातील २३ केंद्रांवर या हौशी नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांत शासनाने स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली. बक्षिसांच्या आकर्षणामुळे काही परजिल्ह्यातील कलाकार स्थानिक संस्थांच्या माध्यमातून अन्य केंद्रांवर नाटके सादर करून पारितोषिके पटकावत असल्याचे प्रकार वाढले आहे. परिणामी, त्या-त्या जिल्ह्यातील हौशी कलाकारांना संधीपासून वंचित राहावे लागत होते.
 
हौशी कलावंतासाठी राज्यातील वरिष्ठ रंगकर्मींनी हौशी प्रायोगिक कलावंत संघटना स्थापन केली. संघटनेचे अध्यक्ष नागपूरचे सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील काही कलाकार सोलापूरसह अन्य केंद्रांवर स्थानिक संस्थांच्या माध्यमातून नाटके सादर करून बक्षिसे मिळवत असल्याचे प्रकार निदर्शनास आले होते. तसेच, अमरावतीपासून अकोला केंद्र स्वतंत्र झाल्यानंतर अमरावतीतील काही कलाकारांनी अकोला केंद्रातून प्रवेशिका दाखल करून स्पर्धेत क्रमांक मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकाराबाबत कलाकारांनी संघटनेसह सांस्कृतिक संचालनालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत नियमांमध्ये स्थानिकतेची अट स्पष्ट करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नाट्यसंस्थांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी मिळावी आणि स्पर्धेचा नाट्यदर्जा उंचावावा, हा या सुधारणांमागील प्रमुख उद्देश आहे. नव्या नियमांमुळे आता प्रवेशिका दाखल करतानाच कलाकाराच्या स्थानिकतेचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
 
काय आहे नवे नियम?
नाटकातील सर्व कलाकार हौशी आणि संबंधित नाट्यसंस्थेचे अधिकृत सभासद असणे आवश्यक.
सहभागी कलाकार संबंधित जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक.
स्थानिक रहिवासाचा पुरावा म्हणून आधारकार्ड अथवा शासनमान्य निवासी पुरावा अर्जासोबत जोडावा लागणार.
कायमस्वरूपी रहिवासाची अट काही प्रमाणात शिथिल; नोकरी किंवा शिक्षणासाठी संबंधित जिल्ह्यात वास्तव्यास असलेला कलाकार स्थानिक म्हणून ग्राह्य. अशा कलाकाराला नोकरी किंवा शिक्षणाचा अधिकृत व सबळ पुरावा सादर करणे बंधनकारक.
या निर्णयामुळे स्थानिक हौशी कलाकारांना कोणत्याही दबावाविना आपले नाटक सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, एका केंद्रावर पुरस्कार मिळविलेले नाटक किंवा कलाकार केवळ बक्षिसांच्या उद्देशाने दुसऱ्या केंद्रावर सादर करण्याच्या प्रकारांनाही चाप बसेल.

— सलीम शेख, अध्यक्ष, हौशी प्रायोगिक कलावंत संघटना, महाराष्ट्र राज्य