तेजप्रताप यादव यांचा खळबळजनक दावा

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
मुंबई
tej pratap yadav राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव सध्या ‘भोजपुरी बवाल’ या शोमधील वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक तसेच राजकीय आयुष्याबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून, जवळच्या व्यक्तींनीच विश्वासघात करून आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला आहे.
 

tej pratap yadav alleges death threats, honeytrap and blackmailing; makes explosive claims on bhojpuri bawal 
‘भोजपुरी बवाल’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात किशोर अजवानी यांनी तेजप्रताप यादव यांच्याशी संवाद साधला. या वेळी तेजप्रताप यांनी आपल्या आजूबाजूच्या काही लोकांकडून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर पैसे देऊन आपल्याविरोधात अपशब्द वापरायला लावले जात होते, जेणेकरून आपण सार्वजनिक जीवनापासून दूर व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
तेजप्रताप यांनी त्यांच्या माजी पीएवरही गंभीर आरोप केले. सोशल मीडियावर त्यांच्या वडिलांच्या नावाने, ‘मी माझ्या मुलाला घरातून बाहेर काढत आहे’, असा मजकूर प्रसारित करण्यात आला होता. मात्र, तो मजकूर लालू प्रसाद यादव यांनी लिहिलेला नसून हरियाणातून आलेल्या ‘जयचंद’ने लिहिल्याचा दावा तेजप्रताप यांनी केला. “मी हे सगळं खुलेआम सांगत आहे आणि त्यांना आव्हानही देत आहे. माझ्या वडिलांचं काहीही बिघडवता येणार नाही,” असे ते म्हणाले.
आपला पीए मोतीलाल हा विरोधकांशी मिळाला असल्याचा आरोपही तेजप्रताप यांनी केला. मोतीलाल पक्षाचा 20 लाख रुपयांचा निधी घेऊन पळून गेला आणि त्याने आपला विश्वासघात केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, याच हरियाणाच्या ‘जयचंद’ने दिल्लीत केंद्रातील एका नेत्याची भेट घेऊन आपली सुरक्षा हटवून घेतल्याचाही दावा त्यांनी केला.
तेजप्रताप यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचेही सांगितले. काही भागांत प्रवास करावा लागतो आणि अशा वेळी आपल्या सुरक्षिततेची चिंता वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. “कदाचित कोणी डायनामाइट लावून देईल. हा जयचंद माझी हत्या करवून देईल,” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात केले.
या संपूर्ण प्रकरणात तेजप्रताप यांनी केलेला सर्वात गंभीर दावा हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगबाबत आहे. पक्षाशी संबंधित कामे करून एका व्यक्तीने सुरुवातीला आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले आणि केस करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत पैसे मागितले गेले, असा दावा तेजप्रताप यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून 5 ते 10 लाख रुपयांची मागणी केली जात होती. तसेच माध्यमांमध्ये आपल्याविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला.
तेजप्रताप यांनी यावेळी एका एफआयआरचाही उल्लेख केला. “मोतीलालसोबत तो राहतो. सर्व विरोधकांचा कट आहे. त्यामुळेच तर जिवाला धोका आहे,” असे त्यांनी सांगितले. तेजप्रताप यांच्या जवळच्या जय सिंह राठोडने नुकतीच एफआयआरची धमकी दिली होती. त्याने तेजप्रताप यांना ‘क्रिमिनल माईंड’ असेही म्हटले होते. मात्र, ‘भोजपुरी बवाल’च्या या भागात तेजप्रताप यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.
मोतीलाल आपले सर्व अपडेट्स ‘जयचंद’ला देत असल्याचाही आरोप तेजप्रताप यांनी केला. आपण कुठे जात आहोत, कोणाला भेटत आहोत, याची संपूर्ण माहिती मोतीलाल त्याला देत असल्याचे त्यांनी सांगितले. “मोतीलालने माझ्या नावाने फसवणूक केली आणि आज माझ्याच पैशांनी कंपनी चालवतोय,” असा आरोपही तेजप्रताप यांनी केला. या वेळी त्यांनी कार्यक्रमात एक रेकॉर्डिंगही ऐकवले.