प्रश्न विचारल्याबद्दल विद्यार्थ्यांना धमकावणे घटनाबाह्य

न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
justice ujjal bhuyan केवळ अधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांच्या मतांपेक्षा वेगळी मते व्यक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांना धमकावले किंवा शिक्षा केली जाऊ शकत नाही, असे महत्तवपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी केले़ प्रश्न विचारण्याचा अधिकार हा लोकशाही नागरिकत्वाचा एक मूलभूत घटक आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या एलएलएम दीक्षांत समारंभात ते बाेलत हाेते़
 
 
 
justice ujjal bhuyan
 
 
न्यायमूर्ती भुयान पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार हे अवज्ञा करण्याचे कृत्य नाही. ती नागरिकत्व, स्वातंत्र्य आणि घटनात्मक जबाबदारीची एक आवश्यक अभिव्यक्ती आहे. प्रश्न विचारल्याबद्दल विद्यार्थ्यांना धमकावता येणार नाही़ तसेच त्यासाठी त्यांना शिक्षा करणे हे संविधानाच्या विरोधात आहे. विद्यापीठे ही मुक्त विचार आणि कठीण प्रश्नांसाठीची जागा असली पाहिजे. भिन्न मते व्यक्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षात्मक कारवाईची धमकी देणे, हे केवळ असंवैधानिकच नाही तर सत्तेचा आणि पदाचा गैरवापर आहे, असेही ते म्हणाले.
लोकशाही म्हणजे प्रत्येकाने एकाच प्रकारे विचार करणे नव्हे
घटनात्मक लोकशाही म्हणजे प्रत्येकाने एकाच प्रकारे विचार करणे नव्हे. संविधान भिन्न श्रद्धा, मते आणि धारणा असलेल्या लोकांना समान सन्मानाने जगण्यासाठी आणि लोकशाही जीवनात सहभागी होण्यासाठी एक चौकट प्रदान करते. प्रत्येकजण एकाच प्रकारे विचार करतो या गृहितकावर लोकशाही समाज उभारला जाऊ शकत नाही. मतभेद नैसर्गिक आहेत आणि ते एका व्यापक घटनात्मक चौकटीत स्वीकारले पाहिजेत. मतभेदांना वाव नसल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जीवनातील सहभागाचा मूळ अर्थच नाहीसा होईल, असेही न्यायमूर्ती भुयान यांनी म्हटले़....बॉक्स.....
असहिष्णुता हा हिंसेचाच एक प्रकार
असहिष्णुता संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे सांगत न्यायमूर्ती भुयान पुढे म्हणाले, असहिष्णु मानसिकता ही संविधानाच्या मूळ भावनेशी विसंगत आहे आणि हिंसेचेच दुसरे रूप बनू शकते. भारत ही बुद्ध आणि गांधींची भूमी आहे. भारतीय समाजात हिंसा आणि असहिष्णुतेला स्थान नसावे.justice ujjal bhuyan संविधान बोलण्याचे, विचार करण्याचे आणि भिन्न मते बाळगण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. जेव्हा मतभेदांना एक वैध मतांतर मानण्याऐवजी दडपून टाकण्यासारखी फेटाळून लावण्यासारखी किंवा शिक्षा करण्यासारखी गोष्ट म्हणून पाहिले जाते, तेव्हा असहिष्णुता घटनात्मक चौकटीला कमकुवत करते, असेही ते म्हणाले.