जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकासाठी पिंजर्यांसह दोन मजली इमारत

इमारतीसाठी जिल्हा नियोजनमधून ९४ लाखांचा निधी मंजूर

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
वर्धा,
district police dog squad पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गेल्या काही दिवसात जिल्हा पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून अत्याधुनिक साधने, वाहने, सीसीटीव्ही कॅमेरे, इमारती होत आहेत. पोलिस तपासात महत्वाची भूमिका असलेल्या श्वान पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून या दोन मजली इमारतीसाठी ९४ लाख रुपये जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे पोलिस दलाच्या आधुनिकतेत आणखी भर पडणार आहे.
 
 

district police dog squad 
 
 
पोलिस तपासात श्वान पथकांची भूमिका महत्वाची असते. विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध, बॉम्ब शोधक व नाशक तसेच अमली पदार्थाच्या शोधासाठी श्वान अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वान पथकांचा वापर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर होत आहे. श्वानांची देखभाल, आहार, प्रशिक्षण तसेच त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी स्वतंत्र इमारत असणे आवश्यक आहे. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे यासाठी मागणी करण्यात येत होती. यावर्षीच्या जिल्हा नियोजनमधून ९४ लक्ष रुपये यासाठी मंजूर केले आहे.
जिल्हा पोलिस दलाकडे सध्या पाच श्वान कार्यरत आहे. याशिवाय बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडे दोन श्वान आहेत. या पथकाकडे श्वानांसाठी वेगळी इमारत आहे. पोलिस दलाच्या पाच श्वानांसाठी मात्र वेगळी इमारत असणे आवश्यक होती. जिल्हा पोलिस दलास पाच श्वान मंजूर असले तरी भविष्यात ही संख्या ८ पर्यंत वाढण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने बांधण्यात येणारी इमारत त्या क्षमतेची असणार आहे.district police dog squad या इमारतीमध्ये प्रत्येक श्वानासाठी स्वतंत्र खोली-पिंजरा असणार आहे.
बरेचदा व्हीव्हीआयपी बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातून श्वान मागविले जातात. त्या श्वानांसह त्यांचे हस्तक व अधिकार्यांची राहण्याची व्यवस्था देखील इमारतीत केली जाणार आहे. श्वानांसाठी भोजन बनविण्याकरिता किचन ओटा, भोजन ठेवण्याची सुविधा, श्वान पथकातील अधिकारी, कर्मचार्यांना बसण्याची व्यवस्था तसेच आवश्यक फर्निचर सुविधा देखील या इमारतीमध्ये असणार आहे.