कानोसा...
अमोल पुसदकर
universal oneness celebration भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे प्रसंग नाहीत, तर जीवनमूल्यांची आठवण करून देणारे संस्कारपर्व आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये साजरे केले जाणारे सहा उत्सवही याच व्यापक उद्देशाने साजरे केले जातात. त्यापैकी रक्षाबंधन हा उत्सव परस्परांचे रक्षण, आत्मीयता, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मता यांचा संदेश देणारा उत्सव आहे.
रक्षाबंधन म्हटले की सर्वप्रथम भाऊ-बहिणीचे नाते आपल्या डोळ्यांसमोर येते. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. परंतु या परंपरेचा अर्थ केवळ दोन व्यक्तींच्या नात्यापुरता मर्यादित नाही. रक्षण म्हणजे केवळ संकटापासून संरक्षण नव्हे; तर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, सन्मानाचे रक्षण करणे, कर्तव्य निभावणे आणि समाजाच्या कल्याणासाठी उभे राहणे होय.
याच व्यापक भावनेला आजच्या काळातील एक महत्त्वपूर्ण विचाराची जोड मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे झालेल्या ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ आणि इस्कॉन मंदिरातील कार्यक्रमात वैश्विक बंधुभाव, कुटुंब, संस्कृती आणि पर्यावरण या विषयांवर विचार मांडले. त्यांच्या विचारांकडे रक्षाबंधनाच्या संदर्भातून पाहिले तर या उत्सवाचा अर्थ आणखी व्यापक होतो. त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना कुटुंब, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण या तीन महत्त्वाच्या ऋणांची आठवण करून दिली.
रक्षाबंधन म्हणजेही एका अर्थाने या तीनही ऋणांच्या रक्षणाचा संकल्प आहे.
पहिले ऋण आहे कुटुंबाप्रतीचे. कुटुंब ही समाजाची पहिली शाळा आहे. संस्कार, प्रेम, त्याग, शिस्त, जबाबदारी आणि सहकार्य यांची सुरुवात कुटुंबातून होते. आज तंत्रज्ञानाच्या युगात एकाच घरात राहूनही संवाद कमी होत आहे. म्हणूनच पालकांनी मुलांना वेळ देणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद साधला, त्यांना आपल्या कुटुंबाची, पूर्वजांची आणि संस्कृतीची ओळख करून दिली, तरच संस्कारांची परंपरा पुढच्या पिढीकडे जाईल. असे झाले तरच भारत खऱ्या अर्थाने भारत राहील. रक्षाबंधन केवळ बहिणीला भावाशी जोडत नाही तर भविष्यातील त्यांच्या पिढ्यांना एकमेकांशी जोडतो.
दुसरे ऋण आहे आपल्या सांस्कृतिक वारशाचे. संस्कृती म्हणजे सण, उत्सव, वेशभूषा, धार्मिक विधी. सत्य, संयम, कर्तव्य, कुटुंबनिष्ठा, मातृ-पितृभक्ती, परस्पर सन्मान, सेवाभाव आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आपल्या संस्कृतीची जीवनमूल्ये आहेत. आपल्या पुढच्या पिढीला ही मूल्ये समजली पाहिजेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे की हिंदुत्वाचा विनाश हा विश्वातील मानवतेचा विनाश आहे. हिंदूंची संस्कृती ही सहअस्तित्वाची संस्कृती आहे. या संस्कृतीचे रक्षण, संवर्धन, पोषण होणे आवश्यक आहे. चित्रविचित्र जाहिराती बनवून रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला कलुषित आणि भ्रमित करण्याचे कार्य काही लोक करताना दिसतात. त्यांनी सुद्धा हा संदेश समजून घेण्याची आवश्यकता आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांच्या रक्षणाचा संकल्प आम्ही ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आम्ही हेही अधोरेखित करतो की आम्हाला एकमेकांच्या अस्तित्वाची आवश्यकता आहे.
तिसरे ऋण आहे निसर्ग आणि पर्यावरणाप्रतिचे. मानवाचे जीवन निसर्गाशिवाय शक्य नाही. हवा, पाणी, जमीन, वृक्ष, प्राणी आणि संपूर्ण पर्यावरण आपल्या अस्तित्वाचा आधार आहेत.universal oneness celebration त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षाला राखी बांधण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. त्यामागील संदेश अत्यंत सुंदर आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” पर्यावरण रक्षणाच्या आमच्या संस्कृतीचे यापेक्षा सुंदर वर्णन आणखी काय असू शकते. नेपाळमध्ये झालेला निसर्गाचा प्रकोप आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. निसर्ग आणि मानव यांच्यात सामंजस्य राहणे फारच आवश्यक आहे. निसर्गाचे दोहनच झाले पाहिजे, शोषण नाही. हीच आमची हिंदू संस्कृती आहे.
न्यू यॉर्कमधील आपल्या विचारांमध्ये पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी जगातील संघर्ष आणि विरोधाभासांवर मात करण्यासाठी कृष्णभावना आणि आध्यात्मिक चेतनेची आवश्यकता अधोरेखित केली. ही चेतना विविधतेतील लोकांना एकत्र आणू शकते, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. समाजामध्ये मतभेद असतील, विचार वेगळे असतील, भाषा आणि परंपरा वेगळ्या असतील; पण माणुसकीचे नाते सर्वांना जोडणारे असू शकते. “आम्ही सर्व माणसे आहोत” हीच भावना सर्वोच्च असली पाहिजे. जगाला एकाच धर्माचा आग्रह धरणारे जे लोक आहेत ते मानवतेला संकटात टाकू पाहत आहेत.
भारतीय संस्कृतीचा मूलभूत विचार “वसुधैव कुटुंबकम्”, म्हणजे संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. कुटुंब हे प्रेमाच्या भरोशावर उभे असते. जगाला एक कुटुंब समजणारा आमचा विचार संपूर्ण जगामध्ये प्रेमाचा संदेश पसरविणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच विचाराचा वारसा घेऊन सर्वत्र काम करीत आहे. न्यू यॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे संघाबद्दलचे विचार वेगळे असल्यामुळे त्यांना सरसंघचालकांचा कार्यक्रम योग्य वाटत नव्हता. अशा विरोधी विचारांच्या लोकांचे सुद्धा संघ स्वागतच करतो. फक्त त्यांनी बाहेरून विरोध करीत राहण्यापेक्षा कार्यक्रमात उपस्थित राहून जर आपले विचार व्यक्त केले असते तर त्यांचेही समाधान करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्यात आला असता.
आज जगासमोर युद्ध, संघर्ष, धार्मिक आणि सामाजिक तणाव, पर्यावरणीय संकटे अशा अनेक समस्या आहेत. अशा वेळी जगाला जीवघेण्या स्पर्धेची नव्हे, तर परस्पर विश्वास, सहकार्य आणि बंधुभावाची गरज आहे. “अवघे धरू सुपंथ” हाच आमच्या संस्कृतीचा संदेश विश्वाला देण्याची आवश्यकता आहे.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्थानिक पातळीवर समाजाने स्वतःच्या समस्या सोडविण्यास सक्षम झाले पाहिजे, हा विचारही मांडला. प्रत्येक प्रश्नासाठी वरून आदेश किंवा मदतीची वाट पाहण्याऐवजी स्थानिक समाजाने एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रीय समस्या असो की सामाजिक किंवा कौटुंबिक या सर्व समस्या सोडविण्यासाठी स्वयंप्रेरणेनी जो कार्य करतो तो स्वयंसेवक आहे. संघाला “सांगकामे” अपेक्षित नाही. हीच स्वयंप्रेरणेची भावना स्वयंसेवकांच्या कार्यात दिसत असते.
आपल्या परिसरात एखादे कुटुंब अडचणीत असेल, एखादा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असेल, एखादी वृद्ध व्यक्ती गरजू असेल, परिसरात स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा एखाद्या सामाजिक समस्येत सहभागाची गरज असेल, तर “कोणी तरी हे करेल” असे न म्हणता मी किंवा आम्ही हे कार्य करू हाच विचार आजची आवश्यकता आहे.
अहंपासून वयंकडे नेणारा रक्षाबंधनाचा हा उत्सव आहे. समाजाने त्यातील सामाजिक अर्थ शोधून त्यानुसार सामाजिक समरसतेचा व्यवहार आपल्या जीवनामध्ये आचरणात आणला पाहिजे. रक्षाबंधन एक दिवसाचा सण नाही तर वर्षभराची आठवण आहे. या निमित्ताने इतके चिंतन पुरेसे आहे.