यवतमाळ
yavatmal-zp यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भ्रष्टाचार, वाढलेला एनपीए व नोकरभरतीच्या मुद्यावरून सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरल्याने सभा चांगलीच वादळी ठरली. आक्रमक सभासदांच्या प्रश्नांना सामोरे जाताना संचालक मंडळ सभेतून निघून गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वणी येथे शेतकरी भवनात ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच काळे कपडे परिधान करून आलेल्या सभासदांनी संचालक मंडळाचा निषेध नोंदवून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
निवडणुकीला अवघे सहा महिने शेष असताना तसेच १७ संचालकांविरुद्ध अपात्रतेचे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असल्याचे सांगत सभासदांनी नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित केला. नोकरभरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सभासदांनी हातात निषेधाचे फलक व काळे झेंडे घेत आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केले. यामध्ये एनपीए, विमा प्रकरणातील कमिशन, बोनस नफा, कल्याण निधीतील तोटा, संचालक अग्रीम, वाढीव खर्च आदी मुद्यांचा समावेश होता.
सत्ताधारी संचालकांकडून प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप करीत सभासदांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर संचालक मंडळ सभेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे सभेचे वातावरण आणखी तापले.
दरम्यान, सभासदांनी स्वतंत्रपणे चर्चा करून नोकरभरती रद्द करण्यासह विविध ठराव मंजूर केल्याचे सांगण्यात आले. यावेळी आसाराम चव्हाण, प्रभाकर बोबडे, विठ्ठल राठोड, रवी आडे, शेख महेबूब, कैलास चव्हाण, मनीष नागतोडे, दिनेश कडू, गणेश राऊत, उत्तम कोवे, विनोद खारकर, विनोद पाटीलसह संचालक उपस्थित होते.