नवी दिल्ली,
vaibhav suryavanshi दुलीप ट्रॉफीमध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीची झलक दाखवत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पूर्व विभागाकडून खेळताना त्याने मध्य विभागाविरुद्ध ९२ धावांची आक्रमक खेळी केली. या अर्धशतकासह वैभव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला असून, त्याने तब्बल ५७ वर्षांपासून कायम असलेला विक्रम मोडला.
या सामन्यापूर्वी वैभवचा दुलीप ट्रॉफीतील पहिला सामना फारसा खास ठरला नव्हता. ईशान्य विभागाविरुद्धच्या लढतीत तो केवळ ८ धावांवर बाद झाला होता. मात्र, गोलंदाजीत त्याने दोन बळी मिळवत आपली छाप पाडली होती. पूर्व विभागाने तो सामना एक डाव राखून जिंकल्याने वैभवला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.
यानंतर पूर्व विभागासमोर मध्य विभागाचे आव्हान होते. मध्य विभागाने प्रथम फलंदाजी करत २६६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात सोमवारी पूर्व विभागाच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारत अवघ्या ४२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने एक षटकारही लगावला. त्याच्या फलंदाजीदरम्यान दोन वेळा झेल सुटल्याने त्याला जीवदान मिळाले.
अर्धशतकानंतरही वैभवने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने ७९ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९२ धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राईक रेट ११६.४६ इतका राहिला. आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याचा डाव संपला आणि अवघ्या ८ धावांनी त्याचे शतक हुकले.
मात्र, शतकापासून दूर राहिल्यानंतरही वैभवने इतिहास रचला. ३१ ऑगस्ट रोजी त्याचे वय १५ वर्षे १५७ दिवस इतके आहे. त्याने ५७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. लक्ष्मण सिंग यांनी १९६९ मध्ये १६ वर्षे २३ दिवसांचे असताना दुलीप ट्रॉफीत अर्धशतक केले होते. आता वैभवने त्यांना मागे टाकत या स्पर्धेत अर्धशतक करणारा सर्वात तरुण फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. पियुष चावला या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने २००५ मध्ये १६ वर्षे ३०७ दिवसांचे असताना अर्धशतक केले होते.