मुंबई
vinayakan अभिनेता विनायकनने पत्नीपासून विभक्त झाल्यानंतरच्या आपल्या आयुष्याबद्दल मन मोकळं केलं आहे. जवळपास ४० वर्षांच्या सहवासानंतर पत्नीपासून दूर झाल्याने आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं त्याने सांगितलं. या परिस्थितीसाठी पत्नीची कोणतीही चूक नसून, आपण तिला पुरेशी शांतता दिली नाही, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.
पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढणं आपल्यासाठी अत्यंत कठीण असल्याचं विनायकनने म्हटलं. पत्नी ही केवळ जीवनसाथी नव्हती, तर मनातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने सांगता येणारी व्यक्ती होती. आता अशी व्यक्ती आयुष्यात नसल्याने हा काळ अत्यंत कठीण जात असल्याचं त्याने स्पष्ट केलं. तब्बल ४० वर्षे एकत्र राहिल्यानंतर अचानक एकटं राहण्याची सवय लावून घेणं सोपं नसल्याचंही त्याने सांगितलं.
विशेषतः दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक बाबी पत्नीच सांभाळत असल्याने तिच्या अनुपस्थितीची जाणीव अधिक तीव्र होत असल्याचं विनायकनने सांगितलं. “मी १९ वर्षांचा असल्यापासून आम्ही एकत्र होतो. आमच्या प्रेमाची सुरुवात महाराजा कॉलेजमध्ये झाली. जवळपास ४० वर्षे एकत्र राहिल्यानंतर ती अचानक निघून गेल्यापासून माझ्यासाठी खूप अवघड झालं आहे. विशेषतः पैसे आणि इतर गोष्टी सांभाळणं,” असं त्याने सांगितलं.
आपल्याला जी-पे (GPay) सारख्या डिजिटल व्यवहारांच्या सुविधांचाही वापर करता येत नसल्याचं विनायकनने नमूद केलं. “माझ्याकडे जी-पे (GPay) सारख्या गोष्टी नाहीत. तीच सर्वकाही सांभाळायची. आजही ती माझ्या अनेक गोष्टींची काळजी घेते. ती माझं युट्यूब चॅनलसुद्धा रिचार्ज करते,” असं विनायकनने सांगितलं.विनायकनने मार्च २०२३ मध्ये सोशल मीडियावर पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. ‘जेलर’मधील भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, आता त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या या भावनिक वक्तव्यामुळे चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.