plan a trip to these places सप्टेंबर महिना म्हणजे पावसाळा ओसरत असतानाच निसर्ग अधिक खुलण्याचा काळ. वातावरणात गारवा असतो, हिरवाई बहरलेली असते आणि अनेक पर्यटनस्थळांवरील गर्दीही तुलनेने कमी झालेली असते. त्यामुळे या काळात सहलीचे नियोजन करण्याचा विचार करत असाल, तर भारतातील ही पाच ठिकाणे तुमच्या यादीत नक्की असायला हवीत.
१. उदयपूर, राजस्थान
मान्सूननंतर उदयपूरचे तलाव आणि आजूबाजूचा परिसर अधिकच खुलून दिसतो. ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सप्टेंबरमध्ये हवामानही आल्हाददायक असते. पावसानंतरची हिरवाई आणि कमी गर्दी यामुळे पर्यटनाचा अनुभव आणखी खास होतो. सिटी पॅलेस, पिछोला तलाव, पॅलेस लेक आणि मॉन्सून पॅलेस ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. मॉन्सून पॅलेसमधून ढगांनी वेढलेल्या टेकड्यांचे विहंगम दृश्य पाहता येते.
२. महाबळेश्वर, महाराष्ट्र
पश्चिम घाटातील महाबळेश्वर सप्टेंबरमध्ये धुके, ढग आणि हिरवाईने नटलेले असते. गार वातावरणामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी तसेच फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरते. आर्थर्स सीट पॉईंट, वेण्णा तलाव आणि एलिफंट हेड पॉईंट यांसारख्या ठिकाणांना भेट देता येते. याशिवाय महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी फार्म्सचाही आनंद घेता येतो.
३. लेह-लडाख
लेह-लडाखचा प्रवास करण्यासाठी सप्टेंबर महिना चांगला पर्याय मानला जातो. या काळात हवामान तुलनेने स्वच्छ राहते आणि रस्ते खुले असतात. पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे शांतपणे परिसराचा आनंद घेण्याची संधी मिळते. पँगोंग तलाव, नुब्रा व्हॅली, खारदुंग ला पास आणि थिक्से मठ ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
४. कुर्ग
कर्नाटकातील कुर्गला ‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ओळखले जाते. सप्टेंबरमध्ये पावसामुळे येथील डोंगररांगा आणि जंगल परिसर हिरवाईने नटलेला दिसतो. कॉफीच्या मळ्यांमधील वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते. आरामदायी सुट्टी घालवण्यासाठी कुर्ग उत्तम पर्याय ठरू शकतो. अब्बे धबधबा, राजा सीट, ताडियांदामूल शिखर आणि कॉफीचे मळे ही येथील प्रमुख ठिकाणे आहेत.
५. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड
उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा कालावधी योग्य मानला जातो. सप्टेंबरच्या सुरुवातीला दरीत विविध प्रकारची पर्वतीय फुले बहरलेली दिसतात. त्यामुळे संपूर्ण परिसर रंगीबेरंगी आणि आकर्षक बनतो. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेल्या या परिसरात ट्रेकिंगसोबतच दुर्मिळ हिमालयीन फुलांचे सौंदर्य अनुभवता येते.