आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?

जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
मुंबई,
asia cup महिला आशिया कप २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा पराभव करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात ९४ धावांनी विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघाच्या पुढील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना देखील लवकरच रंगणार आहे.
 
asia cup
 
भारताने थायलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्माने संघाच्या डावाला आक्रमक सुरुवात करून देताना अवघ्या ३६ चेंडूंत ६४ धावांची शानदार खेळी केली. तिच्या या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना थायलंडचा डाव १६.१ षटकांत अवघ्या ६५ धावांवर आटोपला आणि भारताने ९४ धावांनी विजय मिळवला.
 
या विजयानंतर भारतीय संघ 'अ' गटात अव्वल स्थानावर आहे. थायलंडने आतापर्यंत दोन सामने खेळले असून, त्यापैकी एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे थायलंडच्या खात्यात २ गुण आहेत. भारताचा नेट रनरेट चांगला असल्याने संघाने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. पाकिस्तानने अद्याप स्पर्धेतील पहिला सामना खेळलेला नाही. पाकिस्तानचा पहिला सामना १ सप्टेंबरला थायलंडविरुद्ध होणार आहे.
 
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता ३ सप्टेंबरला आपला दुसरा सामना खेळणार असून, हाँगकाँग चीन हे भारताचे पुढील आव्हान असेल. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पुरेसा वेळ असल्याने भारतीय संघाला तयारीसाठी चांगली संधी मिळणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना विशेष उत्सुकता आहे. स्पर्धेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकून 'अ' गटात आपले अव्वल स्थान कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यातून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल होणार आहे.