पावसाळ्यात धोका वाढला
जुलै महिन्यात २१ रुग्णांची नोंद
नागपूर,
34 swine flu patients in the city शहरात पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लू एच १, एन१ चे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा जुलै महिन्यात सर्वाधिक २१ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते १ ऑगस्टपर्यंत एकूण ३४ रुग्ण नोंदवले गेले आहेत. महिन्यानुसार आकडेवारी आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार स्वाईन फ्लूचे रुग्ण असे-
- जानेवारी : ५
- फेब्रुवारी : ०
- मार्च : १
- एप्रिल : ०
- मे : २
- जून : ४
- जुलै : २१
- ऑगस्ट : १
गेल्या २ महिन्यांत म्हणजे जून आणि जुलैमध्ये एकूण २५ रुग्ण आढळले आहेत. यावरून पावसाळ्यात विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यातील दमट हवामान आणि बदलते तापमान यामुळे स्वाईन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. गर्दीच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीत संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते.
लक्षणे आणि प्रतिबंध
लक्षणे : ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास
प्रतिबंधात्मक उपाय
- ताप, सर्दी, खोकला असल्यास गर्दीत जाणे टाळावे
- सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
- हात वारंवार साबणाने धुवावेत
- लक्षणे दिसल्यास स्वत: औषधोपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- जास्त धोका असणाऱ्या रुग्णांनी वेळीच तपासणी करून घ्यावी
आरोग्य विभाग सतर्क
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. संशयित रुग्णांची तातडीने तपासणी आणि उपचार करण्याची सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.