वाशीम,
accused arrested कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथील ‘दीपक ट्रेडिंग कंपनी’ चे व्यापारी विष्णू नारायण महाकाळ (वय ५८, रा. हराळ, ता. रिसोड) यांची तब्बल १ कोटी ७४ लाख ५१ हजार ६७७ रुपयांची हळद खरेदी करून रक्कमेची परतफेड न करता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी रिसोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी शिवराज रमेशआप्पा आकमार (वय ३७) रा. पानकन्हेरगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली याला आज, ४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्य प्रदेशातील बुर्हानपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विष्णू महाकाळ यांच्याकडून आरोपी अविनाश रमेशआप्पा आकमार व त्याचा भाऊ शिवराज रमेशआप्पा आकमार यांनी जुलै २०२४ मध्ये हळद खरेदी-विक्रीचा करार केला होता. या करारानुसार रिसोड येथून कोट्यवधी रुपयांची हळद खरेदी करून ती बाजारात विकून आलेली रक्कम रोख किंवा बँकेत जमा करण्याचे ठरले होते. मात्र, आरोपींनी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांची हळद घेऊनही त्याची मूळ रक्कम १ कोटी ७४ लाख ५१ हजार ६७७ रुपये परत न करता व्यापार्याची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी फिर्यादी विष्णू महाकाळ यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ४५३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(३), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास वाशीम आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.accused arrested गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बुर्हानपूर येथे छापा मारून आरोपी शिवराज आकमार याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुधाकर आढे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, अंमलदार विनोद अवगळे, विठ्ठल महाले, संदीप दूतोंडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे मंगेश गोपनारायण यांच्या पथकाने पार पाडली आहे.