नवी दिल्ली,
air-india-flight-hit : थायलंडमधील फुकेत येथून भारताची राजधानी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आकाशात अचानक तीव्र हवामानाचा धक्का बसल्याने मोठी खळबळ उडाली. प्रवासादरम्यान अचानक झालेल्या या जोराच्या थरथराटा आणि झटक्यांमुळे विमानाच्या उंचीमध्ये क्षणार्धात बदल झाला. या घटनेत विमानावरील काही प्रवासी आणि विमान कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय२३७९ हे विमान फुकेतवरून दिल्लीच्या दिशेने नियमित उड्डाणावर असताना हवेत तीव्र हवामानाच्या तडाख्यात (टर्ब्युलन्स) सापडले. अचानक लागलेल्या झटक्यांमुळे विमानात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवले.
विमान जमिनीवर उतरल्यानंतर तात्काळ वैद्यकीय पथक आणि विमानतळावरील मदत पथकाने जखमी प्रवाशांची पाहणी केली. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर आणि कर्मचाऱ्यांवर विमानतळावरील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व प्रवाशांची सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत विमान कंपनीच्या प्रवक्त्याने बाधित प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.